वॉशिंग्टन डी. सी - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चिनी कंपनी बाईटडान्स संबंधी नवा कार्यकारी आदेश जारी केला आहे. टिकटॉकची अमेरिकेतील गुंतवणूक ९० दिवसांत काढून घेण्याचा आदेश कंपनीला देण्यात आला आहे. माहिती सुरक्षेचे कारण देत अमेरिकेने चिनी कंपन्यांविरोधात कारवाई सुरु केली आहे. अमेरिकेतील स्थानिक माध्यमांनी यासंबधी वृत्त दिले आहे. टिकटॉक ही चिनी कंपनी बाईटडान्सची उपकंपनी आहे.
'बाईटडान्स कंपनीमुळे अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे. देशाची सुरक्षा व्यवस्था धोक्यात येईल, असे पाऊल कंपनी उचलेल, याचे पर्याप्त पुरावे आमच्याकडे आहेत' असे ट्रम्प यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.
ट्रम्प यांनी मागील आठवड्यातही बाईटडान्स कंपनी संबधी कार्यकारी आदेश जारी केला होता. जर ४५ दिवसांत टिकटॉकमधील गुंतवणूक काढून घेतली नाही, तर अॅप स्टोअरवरुन टिकटॉक काढून टाकण्याचा निर्णय पहिल्या आदेशात होता. नव्या आदेशामुळे कंपनीला आणखी ९० दिवासांचा वेळ मिळाला आहे. तसेच अमेरिकेतील टिकटॉक वापरकर्त्यांची सर्व माहिती डिलिट(काढून टाकण्यात) करण्यात यावी, असे आदेश म्हटले आहे.
अविश्वासहार्य कंपन्यांपासून अमेरिकेचे रक्षण करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प प्रशासन कठोर पावले उचलत असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव माईक पोम्पेओ ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातील म्हणाले होते. पोम्पेओ यांनी बोलताना टिकटॉक आणि वुईचॅट या कंपन्या अविश्वासहार्य असल्याचे म्हटले होते. गुगल आणि अॅपल प्ले स्टोअरवरून ही अॅप काढून टाकण्याच्या प्रयत्नात अमेरिका आहे.
मागील काही दिवसांपासून चीन आणि अमेरिकेमध्ये विविध आघाड्यांवर वाद सुरु आहे. व्यापार युद्ध, कोरोनाचा उगम, हाँगकाँगमधील नागरिकांची गळचेपी, दक्षिण चीन समुद्रातील चीनचे अतिक्रमण यावरून अमेरिका चीनच्या विरोधात उभा ठाकला आहे. भारताने गलवान व्हॅली संघर्षानंतर ५७ चिनी अॅप बंद केले होते. या निर्णयाचे अमेरिकेने स्वागत केले होते. चिनी कंपन्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी अमेरिकेने 'क्लिन नेटवर्क' ही संपकल्पना पुढे आणली आहे. यास चिनने विरोध केला आहे.