वॉशिंग्टन डी.सी - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कासाठी नामांकन मिळालं आहे. इस्रायल आणि संयुक्त अरब अमिरातीमधील संघर्षामध्ये मध्यस्थी करून शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांना हे नामांकन देण्यात आले आहे.
अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 13 ऑगस्ट रोजी इस्रायल आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यात एक करार झाला असल्याची घोषणा केली होती. बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात या कराराचे वर्णन `ऐतिहासिक’ आणि शतकाचा करार, असे केले होते.
डोनाल्ड ट्रम्प यांनी घडवून आणलेल्या इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतानयाहू आणि संयुक्त अरब अमिरातीचे गादीवर असलेले राजपुत्र शेख महंमद बिन झायेद अल नाहयान यांच्यातील वाटाघाटीनंतर हा करार अस्तित्वात आला आहे. मात्र त्यापूर्वी दोन्ही बाजूंमध्ये वाटाघाटींच्या भरपूर फेऱ्या झाल्या. 28 जानेवारीला दोन्ही देशांमध्ये व्हाईट हाऊसमध्ये पहिली बैठक झाली, ज्यात डोनाल्ड ट्रम्प यानी `शांततेचा दृष्टिकोन’ दस्तऐवज सादर केला होता.
प्रथम अमेरिका-अफगाणिस्तान आणि तालिबान तसेच आता इस्रायल यांच्यात शांतता करार घडवण्यासाठी मध्यस्थ म्हणून कामगिरी केल्याची नोंद नावावर असल्याने, ट्रम्प यांना अध्यक्षीय निवडणुकीत विजयाची अधिक संधी आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि जो बिडेन हे दोघे अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. कोरोना महामारी, लॉकडाऊन, आर्थिक मंदी, कृष्णवर्णीयांच्या चळवळी आणि दहशतवाद या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर होणारी ही अध्यक्षीय निवडणूक फार महत्त्वाची ठरणार आहे. गेल्या १०० वर्षांमध्ये पहिल्यांदाच एखाद्या महामारीच्या काळात अध्यक्षीय निवडणुका होत आहेत.