वॉशिंग्टन - अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सत्तेवरून पायउतार झाले असले तरी त्यांच्यावरील महाभियोगाची कारवाई सुरूच आहे. ६ जानेवारीला संसदेवरील हल्ल्यास ट्रम्प यांना जबाबदार धरून महाभियोगाची कारवाई संसदेत सुरू आहे. पुढील महिन्यापासून ट्रम्प यांच्यावरील आरोपांवर युक्तीवाद सुरू होणार आहे.
सशस्त्र बंडाळी घडवून आणल्याचा आरोप -
सोमवारी (२५ जानेवारी) हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्हने ट्रम्प यांच्या विरोधातील महाभियोग कलमांची माहिती दिली. सशस्त्र बंडाळी घडवून आणण्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. जो बायडेन राष्ट्राध्यक्षपदाच्या नावावर संसदेत शिकामोर्तब होणार होते. त्यावेळी ट्रम्प यांनी चिथावणी दिल्यानंतर हिंसाचार झाला असा आरोप त्यांच्यावर आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या निकालावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत निकाल मान्य करण्यास विरोध दर्शवला होता.
महाभियोग घटनाबाह्य ठरवण्याचा प्रयत्न अपयशी -
९ फेब्रुवारीपासून ट्रम्प यांच्या विरोधातील आरोपांवर संसदेत युक्तीवाद सुरू होणार आहे. ट्रम्प यांच्यावरील महाभियोग कारवाई घटनाबाह्य असल्याचा प्रस्ताव रिपब्लिकन पक्षाचे सिनेट रँड पॉल यांनी आणला होता. मात्र, नवनियुक्त संसद सदस्यांनी हा प्रस्ताव फेटाळला. ५५ विरोधी ४५ मतांनी हा प्रस्तान फेटाळण्यात आला.
सहा जानेवारीला संसदेत ट्रम्प समर्थकांचा धुडगूस -
अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प समर्थकांनी ६ जानेवारीला अमेरिकेच्या संसदेत धुडगूस घालत तोडफोड केली होती. जो बायडेन यांच्या विजयावर शिक्कामार्तब करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्यात आले होते. मात्र, यावेळी ट्रम्प समर्थक मोठ्या संख्येने संसदेबाहेर जमले होते. त्यांनी सुरक्षा कवच तोडत इमारतीत घुसण्याचा प्रयत्न केला. संसदेत ट्रम्प समर्थकांनी तोडफोडही केली. यावेळी सिनेट आणि काँग्रेस सदस्यांना बाकाखाली लपण्याची वेळ आली. पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलकांना बाहेर हुसकावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांसोबतच्या झटापटीत एका महिलेचा मृत्यू झाला.