नवी दिल्ली - इराणने अमेरिकेचे हेरगिरी करणारे ड्रोन विमान पाडल्यानंतर संतप्त झालेल्या ट्रम्प यांनी घेतलेला इराणवरील हल्ला करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. अमेरिकेच्या वरिष्ठ प्रशासकिय अधिकाऱ्याने एका अमेरिकी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली.
या अधिकाऱ्याने म्हटले, की आम्ही हल्ल्याच्या तयारीत होतो. आमची विमाने हवेत होती. मात्र, कोणतेही क्षेपणास्त्र डागण्यात आले नाही. तशी सुरुवात करण्यापूर्वीच शांतता राखण्याचे आदेश देण्यात आले. हा आदेश देण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच हा हल्ला थांबवण्याचा निर्णय खुद्द ट्रम्प यांनी घेतला की लष्करी प्रशासनातील काही प्रशासकीय त्रुटींमुळे घेण्यात आला, हेही कळू शकले नाही.
अमेरिकेच्या या निर्णयामुळे इराणवरील धोका टळला आहे. अमेरिकेने यापूर्वी २०१७ आणि २०१८ मध्ये दोन वेळा सिरियावर हवाई हल्ले केलेले आहेत. बुधवारी इराणने अमेरिकेचे हेरगिरी करणारे ड्रोन विमान पाडले. त्यावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आमचे ड्रोन विमान पाडून इराणने खूप मोठी चूक केली आहे, असा धमकीवजा इशारा दिला होता. तसेच त्यांनी इराणचे ड्रोन, काही क्षेपणास्त्र डागण्याची स्थळे आणि काही लष्करी साहित्य असलेल्या ठिकाणांवर हल्ले करण्याचे आदेश दिले होते. हा हल्ला शुक्रवारी पहाटेच्या वेळी करण्यात येणार होता. जेणेकरून जास्त मनुष्यहानी होणार नाही. मात्र, आता हा निर्णय मागे घेण्यात आल्याने इराणवरील धोका टळला आहे.