न्यूयॉर्क - कोविड - 19 वरील लसीला मंजुरी मिळाली आहे. आता आणखी काही गोंधळ किंवा विचित्र परिस्थिती निर्माण न झाल्यास 2021 च्या उन्हाळ्यापर्यंत 'बर्याच गोष्टी' पुन्हा 'सामान्य' झालेल्या असतील, असा विश्वास मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी व्यक्त केला आहे.
'लस मंजूर होऊन लवकर उपलब्ध झाल्यास उन्हाळ्यापर्यंत बहुधा बर्याच गोष्टी सामान्य होतील,' असे गेट्स यांनी गुरुवारी रात्री एका दूरचित्रवाणी मुलाखतीत सांगितले.
फायझर आणि मॉडर्ना या दोन्ही लसींनी यापूर्वीच 90 टक्क्यांहून अधिक परिणामकारक निकाल दर्शविले आहेत. या लसी आपात्कालीन वापराच्या मंजुरीसाठी अर्ज करण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहेत. अमेरिकेत डिसेंबरच्या शेवटीपासून लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा - 'बिडेन, हॅरिसची टीम चांगली' बिल गेट्स यांचा ट्रम्प यांच्यावर निशाणा
'आम्ही कार्यालयांमध्ये परत जाऊ शकू आणि रेस्टॉरंट्स आणि बार पुन्हा उघडता येतील आणि सर्व काही ठीक आहे, असे म्हणता येईल. त्या वेळी आपण आत्तापेक्षा अगदी वेगळ्या टप्प्यात येऊन पोहोचलेले असू,' असे गेट्स यांनी म्हटले आहे. 2021 च्या उन्हाळ्यापर्यंत या बाबी शक्य होतील, असे त्यांचे म्हणणे आहे. संपूर्ण देशातील सर्व शहरांमधील जनजीवन पूर्वपदावर येईल, असा विश्वास गेट्स यांनी सीएनएनशी बोलताना व्यक्त केला. देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात लस पोहोचवण्याच्या सर्वांत कठीण आव्हानाविषयीही त्यांनी विचार व्यक्त केले.
'तातडीची निकड व उपलब्ध लसींची संख्या यांचा ताळमेळ घालणे ही चांगलीच कठीण बाब आहे. आज समजा सर्व लसींचे डोस संपले तरी जगात लसीची गरज असणारे लोक मोठ्या प्रमाणात असणारच आहेत. आपल्याला 10 अब्जापेक्षा जास्त डोसेसची आवश्यकता आहे,' असे गेट्स म्हणाले.
गेट्सची यांचे हे म्हणणे समोर आले असतानाच दुसऱ्या बाजूला अमेरिकेतील कोरोना विषाणूबाधित रुग्णांची सातत्याने वाढ होत आहे. या रुग्णांची आणि मृतांची संख्या दररोज यातील 'वाईट विक्रम' उभे करत आहे. येथील बाधितांचे आणि मृतांचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे.
जगभरात पसरलेल्या कोविड - 19 च्या महामारीशी लढण्यासाठी आवश्यक प्रयत्नांना मदत म्हणून बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनने 350 दशलक्ष डॉलर्सहून अधिक रक्कम देण्याचे कबूल केले आहे.
हेही वाचा - अमेरिकेत 30 मिनिटांत कोविड होम टेस्ट करणाऱ्या किटला मंजुरी