वॉशिंग्टन डी. सी - अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची सिनेट सभागृहाने महाभियोग खटल्यातून निर्दोष मुक्तता केली आहे. मागील एक आठवड्यापासून सिनेटमध्ये युक्तिवाद सुरू होता. सर्व पक्षांनी बाजू मांडल्यानंतर आज मतदान घेण्यात आले. यात ट्रम्प यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव कमी मते पडल्याने नामंजुर झाला. ट्रम्प यांच्यावरील हा दुसरा महाभियोग खटला होता.
दोन तृतीयांश मते न पडल्याने महाभियोग नामंजुर
महाभियोग प्रस्ताव मंजुर होण्यासाठी दोन तृतीयांश म्हणजेच ६७ मतांची गरज होती. मात्र, तेवढी मते पडली नाहीत. ट्रम्प यांना दोषी धरावे या बाजूने फक्त ५७ मते पडली. तर ट्रम्प यांची निर्दोष सुटका व्हावी यासाठी ४३ सदस्यांनी मतदान केले. विशेष म्हणजे ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या ७ सदस्यांनी ट्रम्प यांच्या विरोधात मतदान केले. मात्र, महाभियोग खटला पुढे नेण्यात डेमोक्रॅटिक पक्षाला यश आले नाही. संसदेवरील हल्ल्याच्या घटनेस ट्रम्प जबाबदार असून त्यांना दोषी धरण्यात यावे. यासाठी डेमोक्रॅटिक पक्षाने जोरदार तयारी केली होती. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही.
संसदेवर हल्ला केल्याप्रकरणी चालू होता खटला -
यावर्षी ६ जानेवारी ट्रम्प समर्थकांनी संसदेवर हल्लाबोल केला होता. जो बायडेन यांचा निवडणुकीतील विजय डोनाल्ड ट्रम्प यांना अमान्य होता. राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत फेरफार झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. ६ जानेवारील बायडेन यांच्या विजयावर शिक्कामार्तब करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन भरले होते. त्यावेळी ट्रम्प समर्थकांनी कॅपिटॉल हील या संसेदच्या इमारतीबाहेर निदर्शने केली. तसेच बॅरिकेड् तोडत सभागृहात प्रवेश केला. यावेळी झालेल्या हिंसाचारात ५ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेची जगभरातून निंदा करण्यात आली होती. त्यानंर अध्यक्षपदावर पायऊतार झाल्यानंतही त्यांच्यावरील महाभियोग खटला सुरूच राहिला.