लंडन - ब्रिटनच्या शाही घराण्यातून वेगळे होण्याची घोषणा करणारे राजकुमार प्रिंस हॅरी अणि त्याची पत्नी मेघन पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी शाही घराण्यासंदर्भात अनेक खुलासे केले आहेत. हे वाचून तुम्हीही हैराण व्हाल. मेघन या सावळ्या रंगाच्या असल्यामुळे मुलगा काळ्या रंगाचा होईल, अशी भीती शाही घराण्यातील एका सदस्याला होती. त्यामुळे शाही घराणे प्रिंस हॅरी अणि मेघन यांच्या मुलाला प्रिन्स ही उपाधी देणार नव्हते. दरम्यान, त्यांनी संबंधित सदस्याच्या नावाचा खुलासा केला नाही.
शाही कुटुंबासोबत राहताना अनेकदा आपल्या मनात आत्महत्येचा विचार आल्याचे मेघनने सांगितले. तसेच लग्नापूर्वी केट मेडलट्न यांनी एकदा त्यांना रडवले असल्याचेही मेघनने सांगितले. केट मेडलट्न या प्रिन्स विलियम्स यांच्या पत्नी आहेत. दरम्यान, मेघन गर्भवती असताना त्यांनी अत्यंत वाईट परिस्थितीचा सामना केल्याचे प्रिन्स हॅरीने सांगितले. तसेच त्यांना मेघनचा अभिमान असल्याचेही प्रिन्सने म्हटलं.
प्रिंस हॅरी हे राणी एलिझाबेथ द्वितिय यांचा नातू असून सिंहासनाचा सहावा हकदार आहे. त्यांचा मे 2018 मध्ये अमेरिकन अभिनेत्री मेघन मार्केलशी विन्डसर कॅसल येथे विवाह केला होता. या राजेशाही विवाहसोहळ्याचे चित्रण जगभरातील विविध माध्यमांवरुन करण्यात आले होते. जगभरातील कोट्यावधी नागरिकांनी हा विवाहसोहळा पाहिला होता. परंतु, नंतर या दाम्पत्याने ब्रिटिश माध्यमांनी त्यांची केलेली चौकशी ही असहनीय आणि त्रासदायक असल्याचे म्हटले. प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांनी 6 मे 2019 रोजी आपल्या पहिल्या मुलाला जन्म दिला आहे. गेल्या वर्षी जानेवरीत त्यांनी राजशाहीच्या वरिष्ठ सदस्यपदाचा राजीनामा दिला.