वॉशिंग्टन - पेंटागॉनने आंदोलकांविरोधात सैन्यदल पाचारण करण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची कल्पना फेटाळली आहे. पेंटागॉनच्या प्रमुखांनी काही सैन्यदलाच्या तुकड्या परत बोलाविल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून आंदोलक आणि ट्रम्प प्रशासन यांच्यामध्ये वादाच्या ठिणग्या उडत आहेत. त्यानंतर संतापलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी सैन्यदल बोलावण्याचा इशारा दिला होता. या निर्णयावर संरक्षणमंत्री मार्क इस्पर यांनी टीका केली आहे. यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचे पहिले संरक्षणमंत्री जिम यांनीही जाहीरपणे टीका केली होती.
ट्रम्प यांनी अमेरिकेतील रस्त्यांवर निषेध करणाऱ्या लोकांविरोधात सैन्याचा वापर करण्याचा इशारा दिला. जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा पोलीस अधिकार्याकडून मृत्यू झाल्यानंतर अमेरिकेतील वातावरण ढवळून निघाले आहे. त्यामुळे आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे काही दिवसांपासून दिसत आहे.
सर्व राज्यांच्या गव्हर्नरनी निदर्शकांवर नियंत्रण आणण्यासाठी नॅशनल गार्ड यांना पाचारण करावे, असे आवाहन डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच केले आहे. इस्पर यांनी सैन्यदलाच्या तुकड्या आंदोलकांविरोधात वापरण्यास विरोध दर्शविला. यापूर्वी केवळ 1807 मध्ये सैन्यदलाचा असा अमेरिकेत वापर करण्यात आला होता. मात्र, देशात सध्या तशी वाईट स्थिती नाही, असेही इस्पर म्हणाले आहेत.
ट्रम्प प्रशासनाकडून कृष्णवर्णीयांवर अत्याचार होत असल्याची भावना अमेरिकेत रुजत आहे. दुसरीकडे अमेरिकेमध्ये कोरोनाचे संकट अजूनही शमलेले नाही.