वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा पाळीव श्वान 'बो' याचे शनिवारी निधन झाले. त्याला कॅन्सरची लागण झाली होती, ज्यावर उपचार सुरू असतानाच त्याने प्राण सोडल्याची माहिती ओबामा यांनी दिली. इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित आपण एक सच्चा मित्र गमावल्याची भावना बराक आणि मिशेल ओबामांनी व्यक्त केली.
ओबामा झाले भावूक..
व्हाईट हाऊसमधील गर्दी आणि इतर गोष्टी त्याने सहन केल्या, तो मोठ्याने भुंकायचा मात्र कधी कोणाला चावत नव्हता. त्याला लहान मुलांसोबत खेळायला आवडायचे, तसेच उन्हाळ्यात स्विमींग पूलमध्ये पोहायलाही आवडायचे. त्याचे केसही अगदी छान होते, असे ओबामांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
ओबामांनी राखलं प्रॉमिस..
सेन. एडवर्ड एम. केनेडी यांच्याकडून ओबामांना भेट म्हणून हा श्वान मिळाला होता. ओबामांनी त्यांच्या मुली मालिया आणि साशा यांना प्रॉमिस केले होते, की निवडणुका पार पडल्यानंतर ते घरी पाळीव कुत्रा आणतील. केनेडी यांनी २००८च्या निवडणुकीनंतर हा कुत्रा भेट दिल्यामुळे ओबामांना ते प्रॉमिस पूर्ण करता आलं. यानंतर २०१३च्या ऑगस्टमध्ये ओबामा कुटुंबीयांनी सनी नावाच्या आणखी एका श्वानाला घरी आणलं.
हे दोघेही कित्येक वेळा ओबामांसोबतच असत. त्यामुळे लोकांनाही या दोघांबद्दल उस्तुकता निर्माण झाली होती. व्हाईट हाऊसमध्ये येणाऱ्या लोकांमध्ये बो हा आकर्षणाचा भाग ठरत होता.
हेही वाचा : काबुलमधील शाळेजवळ बॉम्ब हल्ले; ५३ जणांचा मृत्यू