नवी दिल्ली - बहुचर्चित तालिबान शांतता करारासाठी इस्लामाबादचे सहकार्य आवश्यक असले, तरी दहशतवादाला आळा घालण्यासाठी पाकिस्तानवर दबाव कायम ठेवावा लागेल, असे भारताने अमेरिकेला सांगितले आहे.
सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांदरम्यान झालेल्या चर्चेमध्ये, अमेरिका-तालिबान शांतता करार, आणि पाकिस्तानातून होणारा दहशतवाद या दोन मुद्द्यांवर चर्चा झाली.
भारताने अमेरिकेला हेही सांगितले, की शांतता करारानंतर अमेरिकी लष्कर जेव्हा अफगाणिस्तानमधून मायदेशी परतेल, तेव्हा त्यादरम्यान कोणत्याही प्रकारची हिंसा होऊ नये. तसेच, अमेरिकेने गेल्या १९ वर्षांमधील फायदे लक्षात घेत, घटनात्मकदृष्ट्या अल्पसंख्यांक आणि महिलांचे हक्क अबाधित रहायला हवेत.
तब्बल १८ महिन्यांच्या चर्चेनंतर, अखेर अमेरिका आणि दहशतवादी संघटनांमध्ये एक करार अस्तित्वात येत आहे. या कराराद्वारे हे निश्चित केले जाणार आहे, की युद्धग्रस्त देशांमधून परदेशी सैन्य हटवण्यात येईल. याबदल्यात, अफगाणमधील जमिनीचा वापर इतर कोणत्याही देशाविरोधात होणार नाही, यास तालिबानने संमती दर्शवली आहे.
शनिवारी या करारावर स्वाक्षरी करण्यात येणार आहे. या करारासाठी पाकिस्तानचे सहकार्य आवश्यक असल्याचे पाहून अमेरिकेने भारत दौऱ्यामध्ये पाकिस्तानबाबत सावध पवित्रा घेतला होता. त्यामुळेच, भारताने अमेरिकेला सांगितले आहे, की तालिबान शांतता करार अमेरिकेसाठी किती महत्त्वाचा आहे हे आम्हाला माहीत आहे. तरीही, दहशतवादाला आळा घालण्यासाठी पाकिस्तानवरील दबाव कायम ठेवणे गरजेचे आहे.
हेही वाचा : अमेरिका-तालिबान शांतता कराराच्या पार्श्वभूमीवर इम्रान खान कतारमध्ये..