अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जेव्हा कोविड-१९ घटनांबाबत माध्यमांना संबोधित करत असतात, तेव्हा त्यांच्या शेजारी एक जराशी कृश शरीरयष्टी असलेली व्यक्ती असते. यापैकी काही पत्रकार परिषदांमध्ये, या व्यक्तीने ट्रम्प यांच्या काही उतावीळपणे केलेल्या वक्तव्यांमध्ये दुरूस्तीही केली आहे. कहर म्हणजे, अध्यक्षांनी त्यांना आनंदाने आपल्या विधानात दुरूस्ती करूही दिली आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या तोंडावर त्यांना चुकीचे ठरवूनही त्यांचा रोष न ओढावणाऱ्या या व्यक्तिचे नाव आहे अँथनी फाऊची. कोविड-१९ बाबत कोणत्याही माहितीसंदर्भात अमेरिकन नागरिक आता आपल्या अध्यक्षांपेक्षाही फाऊची यांच्या शब्दांवर विश्वास ठेवतात, यात काहीच अतिशयोक्ती नाही.
डॉ. अँथनी स्टिफन फाऊची हे अमेरिकन डॉक्टर आणि रोगप्रतिकारशास्त्रज्ञ असून, 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अॅलर्जी अँड इन्फेक्शस डिसीजेस'चे संचालक म्हणून सेवा बजावत आहेत. १९८१ मधील अमेरिकेचे अध्यक्ष रोनाल्ड रीगन यांच्यापासून ते डोनाल्ड ट्रम्प यांच्यापर्यंत तब्बल ६ अमेरिकन अध्यक्षांबरोबर काम करण्याचा त्यांना अनुभव आहे. गेली ३० वर्षे, फाऊची हे अमेरिकेतील प्रत्येक आरोग्यविषयक संकटात प्रणेते म्हणून राहिले आहेत. आजपर्यंत त्यांनी एचआयव्ही, सार्स, इबोला, मर्स आणि २००१ मध्ये झालेल्या जैविक दहशतवादी हल्ल्यांचा सामना करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. १९८४ मध्ये एड्स या साथीच्या रोगाचा उदय झाला तेव्हा, त्यांनी एचआयव्हीशी लढा देण्यात अमेरिकेच्या धोरण आणि संशोधनाचा मसुदा तयार केला होता.
अमेरिकेच्या एका परिचारिकेला २०१४ मध्ये सिएरा लिओनमध्ये इबोला विषाणुचा संसर्ग झाला तेव्हा संपूर्ण अमेरिका हादरली. यावेळी तिच्यावर उपचार करण्यासाठी कोणताही डॉक्टर तिच्याजवळ जाण्यास तयार होत नव्हता. कारण तेव्हा इबोलाबाबत कोणालाही जास्त माहिती नव्हती, त्यामुळे त्याच्या विषाणूची लागण आपल्यालाही होईल ही भीती डॉक्टरांनादेखील होती. तेव्हा ७४ वर्षीय फाऊची हे स्वतः संरक्षण साधने परिधान करून तिच्यावर उपचार करू लागले. त्यांनी दोन आठवड्यांपर्यंत सातत्याने दररोज दोन तास त्या परिचारिकेची तपासणी केली. ती बरी झाल्यानंतर, त्यांनी माध्यमांसमोर तिला मिठी मारली. इबोला हा काही सार्वजनिक धोका राहिला नाही, याबाबत जनतेला आश्वस्त करण्यासाठी त्यांनी हे केले. द्रवपदार्थ आणि इलेक्ट्रोलाईट्स देऊन इबोला रूग्णांना आजारातून बरे करण्याचे फाऊची यांचे धोरण होते.
इबोला साथीच्या रोगानंतर जवळपास ६ वर्षांनी, फाऊची हे कोविड-१९ विरोधातील व्हाईट हाऊस कृती दलाचा भाग बनले आहेत. देशाचे सरकार पुरेशा कोरोना चाचण्या करण्यात अपयशी ठरले, असा थेट आरोप त्यांनी अमेरिकी काँग्रेससमोर अगदी बिनधास्तपणे केला होता. अमेरिकेत कोविड-१९ आजाराने १ लाख लोक बळी जातील, या फाऊची यांच्या अंदाजाला ट्रम्प यांनीही सहमती दर्शवली आहे. ट्रम्प यांनी त्याअगोदर उत्साहात एका पत्रकार परिषदेत मलेरियाविरोधी औषध हे कोरोनाच्या संसर्गावर उपचारासाठी वापरता येईल, असे जाहीर केले होते. त्याचवेळी फाऊची यांनी तत्परतेने त्यांचा हा दावा खोडून काढला आणि त्यासाठी पुरेसे वैज्ञानिक पुरावे सध्या उपलब्ध नाहीत, असे सांगितले होते. असा रोखठोकपणा आणि हजरजबाबीपणे केवळ फाऊची यांच्यातच असू शकतो!
हेही वाचा : 'अशाप्रकारे उघड धमकी देणारा राष्ट्रप्रमुख मी पाहिला नाही'