मियामी - उत्तर आणि दक्षिण अमेरिका खंडाच्या मध्यभागात असलेल्या कॅरेबियन बेटांना आज रात्री उशिरा ७. ७ तीव्रतेच्या भूकंपाचा झटका बसला. जमैकाच्या वायव्येकडील भागाला भूकंपाचा सर्वाधिक हादरा बसला. भूकंपानंतर परिसरात त्सुनामी येऊ शकते, अशी भीती अमेरिकेच्या भूगर्भशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे.
जमैकाच्या वायव्यकडील भागात १० किमी खोल जमिनीत भूकंपाचा केंद्रबिंदू होता. स्थानिक वेळेनुसार मंगळवारी रात्री १२. ४० वाजता हा भूकंप झाला. भूकंपाचे ठिकाण जमैकातील किनारी शहर लुसिया येथून १२५ किमी अंतरावर होता. जीवितहानी किंवा वित्तहानी जास्त नसावी, अशी माहिती अमेरिकेच्या भूगर्भशास्त्र विभागाने दिली आहे.
काही सेकंद भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिक घराबाहेर पडले. भूकंपाचे व्हिडिओ स्थानिक नागरिकांनी सोशल मिडियावरही टाकले आहेत. प्रशांत महासागरात असलेल्या त्सुनामी इशारा केंद्राने भूकंप क्षेत्रापासून ३०० किमी परिघात त्सुनामी येण्याची शक्यता वर्तवली आहे.
त्सुनामी म्हणजे काय?
जेव्हा भूकंपाचे केंद्र समुद्राच्या तळात असते, तेव्हा हादऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात लाटांची निर्मिती होते. या लाटांमुळे समुद्र किनाऱ्यावर आणि आजूबाजूच्या परिसरात विध्वंस घडतो. त्सुनामी येण्याआधी समुद्राची पाण्याची पातळी कमालीची खालावते. मात्र, नंतर मोठ्या प्रमाणात लाटा किनाऱ्यावर धडकतात.