वॉशिंग्टन डी. सी - जगातील इतर देशांच्या तुलनेत अमेरिकेमध्ये कोरोनाचा सर्वांत जास्त प्रसार झाला आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आता अमेरिकेमध्ये कोरोना लसीकरणाला सुरूवात करण्यात आली आहे. अमेरिकेच्या नवख्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांना मंगळवारी कोरोना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.
कमला हॅरिस यांनी अमेरिकन नागरिकांना लस टोचवून घेण्याचे आवाहन केले आहे. तुमची वेळ आल्यानंतर सर्वांनी कोरोना लसीचा डोस घ्यावा. ही लस तुमचे जीवन वाचवले, असे त्या म्हणाल्या. कमला हॅरिस यांनी कोरोना लसीचा पहिला डोस 29 डिसेंबर 2020 ला घेतला होता.
14 डिसेंबरपासून कोरोना लसीकरण सुरू -
अमेरिकेत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राष्ट्रध्यक्ष जो बायडेन यांनी नवे धोरण आखले आहे. तसेच त्यांनी मास्कचा वापरही बंधनकारक केला आहे. अमेरिकेत 14 डिसेंबरपासून कोरोना लसीकरण करण्यात येत आहे. अमेरिकेच्या फूड अॅन्ड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने Pfizer-BioNtech च्या कोरोना लसीच्या इमर्जंन्सी वापरासाठी मंजुरी दिल्यानंतर लसीकरणाला सुरवात करण्यात आली होती. अमेरिकेत लसीकरणाची सुरुवात एका आरोग्य सेविकेला लस देऊन करण्यात आली होती.
2021 सालाच्या अखेरपर्यंत 1.3 अब्ज डोस -
फायझर या लस निर्मिती करणाऱ्या कंपनीनं आपल्या जर्मन भागीदारी कंपनी बायोएनटेक सोबत मिळून लस विकसित केली आहे. या वर्षाअखेरपर्यंत 5 कोटी डोस आणि 2021 सालाच्या अखेरपर्यंत 1.3 अब्ज डोस तयार करण्याचे ध्येय या कंपनीचे आहे.