जिनिव्हा : 'काश्मीर मुद्दा हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे, त्यामुळे तुम्हाला याबाबत बोलण्याचा काहीही अधिकार नाही' अशा शब्दांमध्ये भारताने पाकिस्तान, तुर्की आणि इस्लामिक सहकार संस्थेला खडसावले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेचे ४६वे सत्र सध्या सुरू आहे. यामध्ये प्रत्युत्तर देण्याच्या अधिकारामध्ये बोलताना काश्मीर प्रश्न याठिकाणी उपस्थित केल्याबद्दल या तिघांना भारताने चांगलीच तंबी दिली.
जिनिव्हामधील कायमस्वरुपी मिशन ऑफ इंडियाचे प्रथम सचिव पवन बधे यांनी सत्राला संबोधित केले. प्रत्युत्तर देण्याच्या अधिकारामध्ये ते म्हणाले, "काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. इस्लामिक सहकार संस्थेकडे याबाबत भाष्य करण्याचा अधिकार नाही. पाकिस्तान आपला अजेंडा पुढे करण्यासाठी इस्लामिक सहकार संस्थेचा वापर करत आहे, हे स्पष्ट आहे. पाकिस्तानला असे करु द्यावे की नाही याचा निर्णय इस्लामिक सहकार संस्थेतील सदस्यांनी घ्यायचा आहे."
"माझ्या देशावर खोटे आरोप करून त्याची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करणे ही आता पाकिस्तानची सवयच झाली आहे. ज्या देशामध्ये सातत्याने अल्पसंख्याकांचा छळ केला जातो आहे, जो देश दहशतवादाचे केंद्रस्थान आहे आणि ज्या देशाचे पंतप्रधान अभिमानाने दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिल्याचे सांगतात अशा देशाने तरी भारत किंवा कोणत्याही देशाला मानवाधिकारांबाबत शिकवू नये" असेही पवन म्हणाले. त्यांनी पाकव्याप्त काश्मीर, सिंध, बलुचिस्तान आणि ख्याबेर पक्तुंख्वा भागामध्ये पाकिस्तान करत असलेल्या दडपशाहीचाही उल्लेख केला. तसेच, देशात पत्रकारांवर होत असलेल्या हल्ल्यांवरुन त्यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला.
हेही वाचा : चीनला मागे टाकत संयुक्त राष्ट्रांच्या महिला आयोगावर भारताची निवड!