जिनेव्हा - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला शनिवारी संबोधित केले. यावेळी इम्रान खान यांनी आपल्या भाषणात काश्मीर आणि अफगाणिस्तानचा उल्लेख करत भारताने एकतर्फी पावले उचलत काश्मीरवर जबरदस्तीने कब्जा केल्याचा आरोप केला. इम्रान खान यांच्या आरोपाला संयुक्त राष्ट्रातील भारताचे प्रतनिधी स्नेहा दुबे यांनी चोख प्रत्युत्तर दिले. जम्मू काश्मीर आणि लद्दाख हे भारताचे अविभाज्य अंग आहेत आणि नेहमीच राहतील. यामध्ये पाकिस्ताने व्यापलेल्या भागांचा देखील समावेश आहे, असे त्या म्हणाल्या.
संयुक्त राष्ट्राच्या सदस्य देशांना माहित आहे की, पाकिस्तानचा इतिहास दहशतवाद्यांना प्रोत्साहन आणि मदत करण्याचा आहे. हे पाकिस्तानच्या धोरणात समाविष्ट आहे. पाकिस्तानने पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपिठाचा वापर भारताविरोधात खोटे बोलण्यासाठी आणि जगाचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी केला आहे. अनेक दहशतवादी पाकिस्तानात मुक्तपणे फिरत आहेत. ओसामा बिन लादेनला पाकिस्तानने आश्रय दिला. आजही पाकिस्तानी नेतृत्व त्याचा 'शहीद' म्हणून गौरव करते. याशिवाय, पाकिस्तान उघडपणे दहशतवाद्यांना पाठिंबा देतो आणि त्यांना शस्त्रे पुरवतो, हे संपूर्ण जगाला माहिती आहे, असेही स्नेहा दुबे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, शनिवारी सकाळी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला संबोधित केले. अमेरिकेतील 9/11च्या हल्ल्यानंतर जगातील उजव्या विचारसरणीच्या लोकांनी मुस्लीम लोकांवर हल्ले सुरू केले. त्याचा भारतात सर्वात मोठा प्रभाव दिसला. तेथे आरएसएस आणि भाजपा मुस्लिमांना लक्ष्य करत आहेत. मुस्लिमांसोबत भेदभाव केला जात आहे. याशिवाय भारताने एकतर्फी पावले उचलून काश्मीरवर जबरदस्तीने कब्जा केला आहे, असा आरोप इम्रान खान यांनी केला. काश्मीरसंदर्भात घेतलेले निर्णय भारताला परत घ्यावे लागेल. काश्मीरमध्ये तोडफोड आणि लष्करी सामर्थ्य कमी करावे लागेल. आम्हाला भारताकडून शांतता हवी आहे. आता चेंडू भारताच्या कोर्टात आहे, असेही ते म्हणाले.
हेही वाचा - पंतप्रधान मोदी न्यूयॉर्कमध्ये दाखल; संयुक्त राष्ट्रसंघाच्या 76व्या सत्राला करणार संबोधित