वॉशिंग्टन : जॉर्ज फ्लॉईड प्रकरणामुळे अमेरिका धुमसत आहे. यातच या वर्णभेद-विरोधी आंदोलनाला दाबण्याचा आदेश देणाऱ्या ट्रम्प यांना टेक्सास राज्यातील ह्यूस्टन शहराच्या पोलीस प्रमुखांनी खडे बोल सुनावले आहेत. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना त्यांनी आपले तोंड बंद ठेवण्यास सांगितले आहे.
"या देशातील एक पोलीस प्रमुख म्हणून मी राष्ट्राध्यक्षांना हे म्हणू इच्छितो - की जर तुमच्याकडे बोलण्यासाठी काही ठोस नसेल, तर तुम्ही तुमचे तोंड बंदच ठेवा!" असे ह्यूस्टनचे पोलीस प्रमुख आर्ट अॅसिव्हेडो हे सीएनएन या वृत्तवाहिनीला मुलाखत देताना म्हणाले.
अमेरिकेत वर्षानुवर्षे चालत आलेल्या वर्णभेदाचा एक नवा बळी म्हणजेच जॉर्ज फ्लॉईड. जॉर्जला अटक करत असताना, एक पोलीस अधिकाऱ्याने त्याच्या मानेवर गुढघा ठेवला होता. जॉर्ज त्याला तो गुडघा काढण्यासाठी आर्जवं करत होता, "मला श्वास घेता येत नाही, कृपया माझा जीव घेऊ नका" असं जॉर्ज म्हणत होता. मात्र, पोलिसाने त्याच्या विनवण्या ऐकल्या नाहीत, आणि श्वास न घेता आल्यामुळे जॉर्जचा मृत्यू झाला! या सर्व प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, त्या पोलिसाच्या आणि देशातील एकूणच वर्णभेदाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरले, आणि एका मोठ्या आंदोलनाला सुरूवात झाली.
'जॉर्ज फ्लॉईड' घटनेशी संबंधित असलेला अधिकारी डेरेक शॉविन याला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील इतर तीन अधिकाऱ्यांना अटक करण्याची मागणी आता आंदोलक करत आहेत.
हेही वाचा : कोरोनामुळे अफगाणिस्तानातील सुमारे 70 लाख बालके मुलभूत हक्कांपासून वंचित