ह्युस्टन - जॉर्ज फ्लॉइडच्या कुटुंबीयांनी भावपूर्ण वातावरणात त्यांना श्रद्धांजली वाहिली; आणि अंत्यसंस्कारा दरम्यान फ्लॉइड यांना न्याय मिळण्यासाठी मागणी केली. यावेळी कुंटुंबीयांसोबत नातेवाईक आणि मित्र परिवाराने ह्युस्टनमधील प्रेज चर्च येथे मंचावर एकत्र येऊन त्यांना अखेरचा निरोप दिला.
यावेळी जवळपास ५०० लोकांनी एकत्र येऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोक मास्क घालून तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत दफनभूमीत उपस्थित होते. उपस्थितांनी पोलिसांच्या कृष्णवर्णीय द्वेशाबाबत तसेच वर्णासंदर्भात असेल्या पूर्वग्रहांचा निषेध नोंदवला.
जॉर्ज यांच्या भावाने त्यांना श्रद्धांजली वाहून 'तो' संपूर्ण जगाला स्मरणात राहणार असल्याचे सांगितले. तसेच 'तो जग बदलणार आहे', असे ते म्हणाले.
काय आहे जॉर्ज फ्लॉइड प्रकरण?
२५ मे रोजी अमेरिकेतील मिनिसोटा राज्यात पोलीस अधिकाऱ्यांने क्रूरतेने जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीय व्यक्तीला पकडले. यानंतर संबंधित अधिकाऱ्याने त्यांच्या मानेवर गुढगा दाबून जॉर्जला बेजार करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. मृत्यू होण्याआधी श्वास घेता येत नसल्याचे ते ओरडत होते. 'आय कान्ट ब्रीद' असे ते पोलीस अधिकाऱ्याला सांगत होते. मात्र अधिकारी त्याच जागेवर राहिल्याने अखेर जॉर्ज यांनी दम तोडला.
संबंधित प्रकरणाचा व्हिडिओ सर्वत्र पसरल्यानंतर सर्व स्तरांतून निषेध व्यक्त होऊ लागला. मिनिसोटामध्ये मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरले. याचे लोण संपूर्ण अमेरिकेत पसरले; आणि सगळीकडे मोठ्या प्रमाणात जाळपोळ आणि तोडफोड करण्यात आली. ऐन महामारीच्या काळात लाखो लोक आंदोलनात सहभागी झाले. यामुळे अमेरिकेतल्या अनेक प्रांतात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न समोर आला. राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान म्हणजेच व्हाइट हाऊस समोर देखील आंदोलनकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले.
विविध स्तरांमधून व्यक्तींनी या प्रकरणाचा निषेध नोंदवला. दंगलींचा सामना करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी लष्कराला पाचारण करण्याचा इशारा दिला.
दरम्यान, या सर्व प्रकारानंतर अमेरिकेतील गौर आणि कृष्णवर्णीय वर्गीतील वाद चव्हाट्यावर आला. तसेच कृष्णवर्णीयांसोबत होणारा अत्याचार आणि भेदभाव जगासमोर आला. त्यातच अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चिथावणीखोर वक्तव्य केल्याने हे प्रकरण आणखी चिघळले. अखेर आज जॉर्ज फ्लॉइड यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.