कॅलिफोर्निया - अमेरिकेत वांशिक भेदभावाला खतपाणी घालण्यात येणारे काही गटांचे प्रयत्न फेसबुकने हाणून पाडले आहेत. श्वेतवर्णीयांच्या श्रेष्ठत्वाचा पुरस्कार करणारे 200 सोशल मीडिया अकाउंट फेसबुकने बंद केली आहेत. या अकाउंटमधून कृष्णवर्णीयांच्या आंदोलनात हत्यारांसह उपस्थित राहण्याची चिथावणी देण्यात आली होती.
कृष्णवर्णीयांबाबत द्वेष पसरवणारे प्राऊड बॉईज आणि अमेरिकन गार्ड हे सोशल मीडियाचे अकाउंट यापूर्वी फेसबुकने आणि इंस्टाग्रामने बंद केली आहेत.
अमेरिकेमध्ये कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉईड याला काही पोलिसांनी निर्दयपणे मारले होते. त्यानंतर अमेरिकेत कृष्णवर्णीयांनी आंदोलन सुरू केले आहेत. या पार्श्वभूमीवर फेसबुक आणि इंस्टाग्रामने अनेक सोशल मीडियाच्या अकाउंटवर देखरेख ठेवण्यासाठी सुरुवात केली आहे. चिथावणीखोर पोस्ट फेसबुककडून सातत्याने काढण्यात येत आहेत.
फेसबुकचे दहशतवादविरोधी संचालक ब्रायन फिशमन म्हणाले, की हे ग्रुप काही समर्थकांसह मोर्चे काढणार होते. तर त्यांचे काही समर्थक हे निषेध मोर्चाच्या ठिकाणी जाणार होते.
हे सोशल मीडियाचे अकाउंट कोण चालवत होते, याबाबत फेसबुकने माहिती दिलेली नाही. मात्र, सुमारे 190 सोशल मीडियाचे अकाउंट बंद करण्यात आल्याचे ब्रायन फिशमन यांनी सांगितले.
द्वेषमूलक पेज व ग्रुप तसेच अकाउंट्स यापुढेही बंद करण्यात येणार असल्याचे फेसबुकने म्हटले आहे.