न्यूयार्क - सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकने गुरुवारी रात्री उशिरा आपल्या कंपनीच्या नवीन नावाची घोषणा केली. कंपनीचे नाव बदलून ‘मेटा’ केले आहे. 17 वर्षांनंतर फेसबुकने ट्विट करून नाव बदलण्याच्या या निर्णयाची माहिती दिली. गेल्या अनेक दिवसांपासून फेसबुकचे नाव बदलण्याची चर्चा सुरु होती. गुरुवारी अधिकृतपणे याबाबतची घोषणा करण्यात आली.
कंपनी केवळ सोशल मीडिया कंपनीपासून “मेटाव्हर्स कंपनी” बनणार आहे आणि “एम्बेडेड इंटरनेट” वर काम करेल, जे वास्तविक आणि आभासी जग एकत्र करेल, असं फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मार्क झुकेरबर्ग यांनी जाहीर केले आहे. जगभरात 3 अब्जाहून अधिक लोक फेसबुक वापरतात. त्याचवेळी, भारतात फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या 41 कोटी आहे.
'मेटाव्हर्स' हा शब्द तीन दशकांपूर्वी एका डिस्टोपियन कादंबरीत वापरला गेला होता. मात्र, सध्या हा शब्द सिलिकॉन व्हॅलीमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. डिजिटल जगात आभासी आणि परस्परसंवादी संबंध स्पष्ट करण्यासाठी हा शब्द वापरला जातो. मेटाव्हर्स हे खरं तर एक आभासी जग आहे. जिथे माणूस शारीरिकदृष्ट्या नसला तरीही अस्तित्वात असले. यासाठी आभासी वास्तवाचा वापर केला जातो.