वॉशिंग्टन डी. सी - अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीनंतर मतमोजणी सुरू आहे. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून 'घोटाळे थांबवा' असे ट्विट केले आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन हे आघाडीवर असून त्यांना विजयासाठी फक्त ६ मतांची गरज आहे. त्यांना आत्तापर्यंत २६४ मते मिळाली असून रिपब्लिक पक्षाचे उमेदवार आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना २१४ मते मिळाली आहेत.
बायडेन जिंकलेल्या राज्यांना ट्रम्प न्यायालयात आव्हान देणार
निवडणुकीच्या वेळेनंतर जमा झालेली मते ग्राह्य धरू नका, अशी मागणी ट्रम्प यांनी केली आहे. मात्र, नियमानुसार सर्व राज्यात मतमोजणी सुरू आहे. यावरून ट्रम्प यांनी न्यायालयात जाणार असल्याचे म्हटले आहे. बायडेन यांनी नुकतेच जिंकलेल्या राज्यातील मतदान प्रक्रियेला आम्ही न्यायालयात आव्हान देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. कालपासून मतमोजणी थांबवा, असे ट्रम्प म्हणत आहेत.
चुरशीची लढत
जो बायडेन यांनी मिशिगन आणि विस्कॉन्सिन राज्यात विजय मिळवला आहे. २०१६ च्या निवडणुकीत ही राज्ये रिपब्लिकन पक्षाच्या ताब्यात होती. या विजयानंतर ट्रम्प पुन्हा निवडून येण्याची शक्यता कमी झाली आहे. जो बायडेन यांना आत्तापर्यंत २६४ मते (इलेक्टोरल) मते मिळाली असून ट्रम्प यांना २१४ मते मिळाली आहेत. विजयसाठी उमेदवाराला २७० मतांची गरज असून बायडेन यांना फक्त ६ मतांची गरज आहे. नवाडा राज्यात काट्याची टक्कर पाहायला मिळत आहे. ट्रम्प आणि बायडेन यांच्यात फक्त १२ हजार मतांचा फरक आहे.