ब्राझिलिया - ब्राझीलमधील अॅमेझॉनच्या जंगलात मागील काही महिन्यांत बेसुमार जंगलतोड वाढली आहे. सरकार अवैध लाकूडतोड आणि खाणकाम थांबविण्यासाठी सैनिकांना पाठवण्याच्या तयारीत असल्याने त्यााधीच जंगलतोड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. देशातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस रिसर्चने याबाबत माहिती दिली आहे.
एप्रिल २०२० महिन्यात अॅमेझॉनच्या जंगलातील ४०५ स्केअर कि. मी. भागातील जंगल तोडण्यात आले आहे. त्यामानाने एप्रिल २०१९मध्ये फक्त २४८ स्क्वेअर कि. मी. क्षेत्रावरील जंगल नष्ट झाले होते. जानेवारी ते एप्रिल २०२० या काळात अवैध जंगलतोड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मुख्यत: लाकूडतोड व्यावासायिक आणि जनावरे चारणाऱयांनी हे जंगल नष्ट केले आहे. मागील तीन महिन्यांत ५५ टक्क्यांनी जास्त भाग सपाट करण्यात आला आहे, अशी माहिती सरकारने दिली आहे.
जैर बोलसोनारो ब्राझीलच्या राष्ट्रपतीपदावर निवडून आल्यानंतर देशात जंगलतोड मोठ्या प्रमाणात वाढली आहे, असे जंगल संवर्धन गटांचे म्हणणे आहे. जंगल संरक्षित भागांमध्ये जास्त शेती आणि खाणकामामुळे नागरिकांची गरीबी हटवता येईल, असा युक्तीवाद जैर यांनी केला होता. बोलसोनारो सरकारच्या अनेक योजनांवर विरोधकांनी टीका केल्या मात्र, ब्राझीलमधील जंगल सुरक्षित असल्याचा बोलसोनारो यांनी दावा केला आहे.