वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुका तोंडावर आल्यामुळे देशातील वातावरण चांगलेच तापले आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि जोई बिडेन हे दोघे अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. यातच आता ओसामा बिन लादेनच्या पुतणीने ट्रम्प यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे. ट्रम्प जर निवडून आले नाहीत, तर ९/११ प्रमाणे आणखी दहशतवादी हल्ला होऊ शकतो असे मत तिने व्यक्त केले.
नूर बिन लादेन, ही ओसामा बिन लादेनचा मोठा भाऊ यसलाम बिन लादेन याची मुलगी आहे. ओसामा बिन लादेनच्या कुटुंबातील व्यक्ती आपल्या नावाचा उच्चार लादेन न करता, लादिन करतात. सध्या नूर ही स्वित्झर्लँडमध्ये राहते. "ओबामा-बिडेन यांच्या कार्यकाळात इसिसला चांगलेच पेव फुटले, आणि युरोपमध्ये त्याचा प्रसार झाला. ट्रम्प यांनी अशा दहशतवादी हल्ल्यांपासून अमेरिकेला सुरक्षित ठेवले आहे. ट्रम्प दहशतवादी हल्ला होण्याची वाट पाहत नाहीत, तर त्याआधीच ते दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळतात" असे नूर म्हणाली.
सध्याच्या काळात अमेरिकेला ट्रप्म यांची गरज आहे. मी स्वतः मनाने कायम अमेरिकी असल्यामुळेच, मी ट्र्म्प यांना समर्थन देत आहे, असे नूर एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.
कोरोना महामारी, लॉकडाऊन, आर्थिक मंदी, कृष्णवर्णीयांच्या चळवळी आणि दहशतवाद या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर होणारी ही अध्यक्षीय निवडणूक फार महत्त्वाची ठरणार आहे. गेल्या १०० वर्षांमध्ये पहिल्यांदाच एखाद्या महामारीच्या काळात अध्यक्षीय निवडणुका होत आहेत.
हेही वाचा : चंद्राच्या ध्रुवांवर आढळले गंजाचे नमुने; पृष्ठभागावर पाणी आणि ऑक्सिजन असल्याचे संकेत