वॉशिंग्टन डी. सी - नवनिवार्चित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी परराष्ट्र खात्याची महत्त्वाची जबाबदारी भारतीय-अमेरिकन वंशाच्या महिलेकडे दिली आहे. उर्झा झेया असे या महिलेचे नाव असून त्या माजी राजनैतिक अधिकारी आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या निती आणि धोरणांचा विरोध म्हणून त्यांनी २०१८ साली राजनैतिक अधिकारी पदाचा राजीनामा दिला होता. मात्र, आता बायडेन यांनी त्यांच्याकडे पुन्हा जबाबदारी सोपवली आहे.
बायडेन यांनी केली घोषणा
उर्झा झेया असे या भारतीय-अमेरिकी वंशाच्या महिलेचे नाव आहे. झेया यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालयातील नागरी सुरक्षा, लोकशाही आणि मानवी हक्क या विभागाचा कारभार सोपवण्यात आला आहे. जो बायडेन यांनी त्यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणाही केली आहे. अँटोनी ब्लिंकेन हे अमेरिकेचे नवनियुक्त परराष्ट्र मंत्री असणार आहेत. बायडेन यांनी त्यांची घोषणा केली. परराष्ट्र मंत्रालयात नियुक्ती करण्यात आलेल्या सर्व सदस्यांनी मागील काही दिवसांत मोठे यश मिळवलेले आहे. जागतिक स्तरावर अमेरिकेला जगात आघाडीवर ठेवण्यासाठी नवनियुक्त केलेले सर्वजण काम करतील, असे बायडेन यांनी म्हटले आहे.
संसदेची सुरक्षा व्यवस्था वाढवली -
नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन २० जानेवारी पदाची शपथ घेणार आहे. या कार्यक्रमाला कोणतेही गालबोट लागू नये, तसेच संसदेवरील हिंसाचारासारखी घटना घडू नये म्हणून पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. अॅरिझोना राज्यात पुन्हा आंदोलन होण्याची चिन्हे दिसत असल्याने पोलिसांनी स्टेट कॅपिटोल इमारतीला काटेरी कुंपण लावून सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.