वॉशिंग्टन - भारताला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी स्थान मिळायला हवे, अशी इच्छा अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांनी व्यक्त केली असल्याची माहिती परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांनी शुक्रवारी दिली. तसेच अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत आमच्या अध्यक्षपदाचे कौतुक होते, असेही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
भारताला 7 वेळा मिळाले सदस्यपद -
यूएनएससीमध्ये 15 सदस्य असतात. ज्यात 10 अस्थायी आणि 5 स्थायी सदस्य असतात. पाच स्थायी सदस्यांमध्ये चीन, फ्रान्स, रशिया, यूके आणि अमेरिका यांचा समावेश आहे. तर दरवर्षी पाच अस्थायी सदस्यांची दोन वर्षांसाठी निवड करण्यात येते. याकरिता संयुक्त राष्ट्रसंघामध्ये निवडणुका घेण्यात येतात. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारत संस्थापक सदस्यांपैकी एक आहे. 1950-1951, 1967-1968, 1972-1973, 1977-1978, 1984-1985, 1991-1992, 2011-2012 या वर्षांमध्ये 7 वेळा भारताला परिषदेचे अस्थायी सदस्य म्हणून निवडले गेले आहेत.
मोदींकडून बायडेन यांचे कौतुक -
पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती जो बायडेन यांच्यात शुक्रवारी पहिली द्विपक्षीय बैठक पार पडली. यावेळी व्यापार, कोरोना, हवामान बदल आदी विषयांवर चर्चा झाली. बैठकीनंतर बोलताना पंतप्रधान मोदी यांनी यो बायडेन यांचे कौतुक केले. तसेच विविध आव्हानांवर मात करण्यासाठी भारत-अमेरिका एकत्र काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, जानेवारीपासून पंतप्रधान मोदी आणि बायडेन तीन शिखर परिषदांमध्ये सहभागी झाले आहेत. त्यापैकी दोन अध्यक्ष बायडेन यांनी आयोजित केल्या होत्या.
हेही वाचा - जो बायडेन यांनी महात्मा गांधींच्या जयंतीचा केला उल्लेख, पंतप्रधान मोदी म्हणाले...