वॉशिंग्टन डी.सी. - जगभरामध्ये कोरोनाचा प्रसार झाला असून याचा सर्वांत जास्त फटका अमेरिकेला बसला आहे. यातच अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. रिपब्लिक पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांच्याकडून सत्तेत येण्यासाठी जोरदार प्रचार सुरू आहे. अमेरिकेला सर्वांत मोठा धोका रशियापासून आहे. तर चीन हा अमेरिकेचा प्रतिस्पर्धी आहे, असे जो बायडेन म्हणाले.
डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन यांची शेवटची अध्यक्षीय डिबेट (वादविवाद) टेनिसीमध्ये पार पडली होती. रशियाने जो बायडेन यांना 3.5 दशलक्ष डॉलर्स दिल्याचा दावा ट्रम्प यांनी वादविवाद फेरीत केला होता. मात्र, जो बायडेन यांनी ट्रम्प यांचा दावा फेटाळला. कधीही परकीय स्त्रोतांकडून पैसे घेतले नाही. मी विजयी व्हावे, असे रशियाला वाटत नाही, असेही ते म्हणाले. तर ट्रम्प यांच्या दाव्यावर रशियाचे सर्वेसर्वा व्लादिमीर पुतिन यांनी बोलणे टाळले.
अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकांमध्ये रशियाचा हस्तक्षेप ?
अमेरिकात 2016 ला झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकांमध्ये रशियाने हस्तक्षेप केल्याचा आरोप झाला होता. यावर अमेरिका आणि रशिया या दोन्ही देशांनी असे काही नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते. तर अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएच्या एका अधिकाऱ्याने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी व्यक्तिगतरित्या अमेरिकेच्या निवडणुकीत हस्तक्षेप केला असल्याचा खुलासा केला होता.