हैदराबाद : बिल आणि मेलिंडा गेट्स यांनी २०२१ सालासाठीचे वार्षिक पत्र आज शेअर केले, “द इयर ग्लोबल हेल्थ वेण्ट लोकल” (जागतिक आरोग्य स्थानिक स्तरावर आणणारे वर्ष) असे पत्राचे शीर्षक आहे. या वर्षीच्या पत्रात बिल आणि मेलिंडा गेट्स यांनी कोविड-१९ साथीचा जगभरात झालेला परिणाम आणि सामाजिक आरोग्यासाठी झालेल्या इतिहासातील सर्वांत मोठ्या प्रयत्नामधील जागतिक समन्वय व वैज्ञानिक नावीन्यपूर्णता यांवर प्रकाश टाकला आहे. जग या साथीतून अधिक कणखर, अधिक निरोगी व अधिक घातसाही होऊन बाहेर पडेल याबद्दल आपण आशावादी का आहोत हे त्यांनी या पत्राद्वारे सांगितले आहे. त्याचप्रमाणे समानतेला प्राधान्य देणे व पुढील साथीच्या दृष्टीने सज्ज राहणे ही दोन क्षेत्रे अधिक चांगला भविष्यकाळ घडवण्यासाठी कशी आवश्यक आहेत यावर त्यांनी चर्चा केली आहे.
“कोविड-१९ आजाराने अनेकांचे प्राण घेतले, लक्षावधींना आजारी केले आणि जागतिक अर्थव्यवस्थेला एका विनाशकारी मंदीच्या गर्तेत ढकलले,” बिल आणि मेलिंडा लिहितात. “यातून सावरण्यासाठी अद्याप आपल्याला अजून दीर्घ प्रवास करणे आवश्यक असले, तरी नवीन चाचण्या, उपचारपद्धती व लशींच्या स्वरूपात जगाने काही लक्षणीय विजय साध्य केले आहेत. या नवीन साधनांनी लवकरच समस्यांचे निराकरण होऊ लागेल, असा विश्वास आम्हाला वाटतो.”
साथीवर मात करण्याच्या प्रयत्नांना प्रतिसाद म्हणून जगभरातील उदार व्यक्तींनी संसाधनांच्या स्वरूपात देणग्या दिल्या, प्रतिस्पर्ध्यांनी संशोधनातील निष्कर्षांचे आदानप्रदान केले आणि अनेक वर्षांच्या जागतिक गुंतवणुकीने विक्रमी वेळात लशीचा विकास, सुरक्षित डिलिव्हरी व प्रभावी लस यांचे नवीन विश्व खुले केले, असे बिल आणि मेलिंडा यांचे म्हणणे आहे. मात्र, त्याचबरोबर साथीमुळे आरोग्यक्षेत्रातील अनेक असमानता तीव्र झाल्या आहेत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, विशिष्ट वर्णाचे समुदाय, गरीब आणि स्त्रिया यांना दिली जाणारी असामनतेची वर्तणूक विशेषत्वाने दिसून आली आहे, असा इशारा ते देतात. या साथीमुळे रोगप्रतिकारशक्तीतील असमानता हा अन्यायाचा एक नवीन प्रकार कायमस्वरूपी प्रस्थापित होऊ शकेल, अशी चिंता बिल आणि मेलिंडा व्यक्त करतात. विषाणूच्या असमान सामाजिक व आर्थिक परिणामावर उपाय म्हणून सर्वसमावेशक प्रतिसाद दिला पाहिजे, असे आवाहन ते करतात.
“कोविड-१९ हा कोठेही धोकादायक आहे हे संपन्न राष्ट्रांनी लक्षात ठेवावे, असे आवाहन आम्ही साथीच्या सुरुवातीच्या काळापासून करत आहोत. लस सर्वांपर्यंत पोहोचेपर्यंत आजाराचे नवीन प्रकार पुढे येतील. असमानतेचे चक्र सुरूच राहील,” असे मेलिंडा लिहितात. “२०२० साली विकसित झालेल्या प्राणरक्षक विज्ञानामुळे २०२१ मध्ये जास्तीतजास्त लोकांचे प्राण वाचले पाहिजेत यासाठी जग एकत्र येते की नाही यावर सर्वकाही अवलंबून आहे.”
नवीन साथीबद्दल आत्ताच विचार करणे आवश्यक आहे, यावर बिल आणि मेलिंडा भर देतात. नवीन साथ रोखण्यासाठी आपल्याला दरवर्षी अब्जावधी डॉलर्स खर्च करावे लागणार असले, तरी कोविड-१९ साथीमुळे जगाला अंदाजे २८ ट्रिलियन डॉलर्सचा फटका बसला आहे, असे त्यांनी नमूद केले आहे. चाचण्या, उपचार आणि लशींसाठी सातत्यपूर्ण गुंतवणूक करण्याचे आवाहन ते करतात तसेच रोगांच्या साथी सुरू झाल्यानंतर लगेचच त्या ओळखून जागतिक स्तरावर सावधगिरी बाळगण्याचे महत्त्व या विषयावरही त्यांनी या पत्रात विवेचन केले आहे.
“साथींना आपण किती गांभीर्याने घेतले पाहिजे हे आता जगाला समजले आहे,” बिल लिहितात. “नवीन साथीबाबत सज्जतेसाठी धोरणे आखली जात असल्याचे आपण बघतच आहोत आणि येत्या काही महिन्यात यात वाढ होईल, असे मला अपेक्षित आहे. कोविड-१९ साथीच्या प्रतिकारासाठी जग सज्ज नव्हते. पुढील साथीच्या वेळी परिस्थिती वेगळी असेल.”
प्रत्येक व्यक्ती आरोग्यपूर्ण व उत्पादनक्षम आयुष्याची संधी प्राप्त करण्यासाठी पात्र आहे या विश्वासावर बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन स्थापन करण्यात आली आहे. आजपर्यंत फाउंडेशनने कोविड-१९ साथीविरोधात लढण्यासाठी १.७५ अब्ज डॉलर्सचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये लशी, चाचणी व उपचारांच्या विकासासाठी व न्याय्य डिलिव्हरीसाठी सहाय्य पुरवण्याचा समावेश आहे.
मेलिंडा गेट्स यांच्याविषयी..
मेलिंडा गेट्स या सेवाभावी कार्यकर्त्या, उद्योजक तसेच स्त्रिया व मुलींसदर्भातील मुद्दयांच्या जागतिक स्तरावरील पुरस्कर्त्या आहेत. बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनच्या को-चेअर म्हणून, मेलिंडा जगातील सर्वांत मोठ्या सेवाभावी प्रतिष्ठानाची दिशा व प्राधान्यक्रम निश्चित करतात. त्या ‘पायव्होटल व्हेंचर्स’ या गुंतवणूक तसेच इनक्युबेशन कंपनीच्या संस्थापकही आहेत. अमेरिकेतील स्त्रिया व कुटुंबाच्या सामाजिक प्रगतीला चालना देण्यासाठी ही कंपनी काम करते. ‘मोमेंट ऑफ लिफ्ट’ हे त्यांनी लिहिलेले पुस्तक बेस्टसेलर ठरले आहे.
मेलिंडा टेक्सासमधील डल्लास येथे वाढल्या. त्यांनी ड्युक विद्यापीठातून कम्प्युटर सायन्समध्ये पदवी प्राप्त केली आणि ड्युक्स फुका स्कूलमधून एमबीए केले. मेलिंडा त्यांच्या करिअरमधील पहिली १० वर्षे मायक्रोसॉफ्टमध्ये मल्टिमीडिया उत्पादने विकसित करत होत्या. त्यानंतर कुटुंबावर तसेच सेवाभावी कामांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांनी कंपनीतील काम सोडले. त्या सिअॅटल, वॉशिंग्टन येथे आपले पती बिल यांच्यासोबत राहतात. त्यांना जेन, रोरी आणि फोबे अशी तीन मुले आहेत.
बिल गेट्स यांच्याविषयी..
बिल गेट्स हे बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे को-चेअर आहेत. १९७५ मध्ये बिल गेट्स यांनी पॉल अॅलेन यांच्यासह मायक्रोसॉफ्ट कंपनीची स्थापना केली आणि मायक्रोसॉफ्ट बिझनेस आणि पर्सनल सॉफ्टवेअर व सर्व्हिसेसमधील जगातील आघाडीची कंपनी झाली. जगातील सर्वांत वंचित घटकांना संधी देण्यासाठी झटणाऱ्या आपल्या फाउंडेशनच्या कामावर पूर्णवेळ लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय बिल यांनी २००८ मध्ये केला. को-चेअर मेलिंडा गेट्स यांच्यासह ते फाउंडेशनच्या धोरणविकासाचे नेतृत्व करतात आणि संस्थेची एकंदर दिशा निश्चित करतात. २०१० मध्ये बिल, मेलिंडा आणि वॉरन बफेट यांनी गिव्हिंग प्लेजची स्थापना केली. जगातील सर्वांत श्रीमंत कुटुंबे व व्यक्तींनी, त्यांच्या जिवंतपणी किंवा इच्छापत्रामध्ये, निम्मी संपत्ती परोपकारी कामांना व सेवाभावी संस्थांना दान करण्याचा सार्वजनिक वायदा करावा यासाठी प्रोत्साहन देण्याचा गिव्हिंग प्लेज हा एक प्रयत्न आहे. २०१५ मध्ये बिल यांनी ब्रेकथ्रू स्वरूपाचे एनर्जी कोअॅलिशन निर्माण केले. पर्यावरणपूरक ऊर्जेसंदर्भातील नवोन्मेषाप्रती वचनबद्ध व्यक्ती तसेच संस्थांचा हा समूह आहे. त्यापाठोपाठ २०१६ मध्ये ब्रेकथ्री एनर्जी व्हेंचर्स आणली. अत्याधुनिक पर्यावरणपूरक ऊर्जा कंपन्यांना दीर्घकालीन भांडवल (पेशंट कॅपिटल) पुरवण्यात मदत करणारा हा एक गुंतवणूकप्रेरित निधी आहे.