वॉशिंग्टन डी. सी - राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रॅलीचे आयोजन करणाऱ्या सहा कर्मचारी सदस्यांची कोरोना विषाणू चाचणी सकारात्मक आली आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष पदाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टुल्सा येथे डोनाल्ड ट्रम्प यांची रॅली होणार होती. मात्र, रॅलीच्या काही तासांपूर्वींच कर्मचाऱ्याचा कोरोना चाचणी अहवाल आला आहे.
या रॅलीचे संचालक टिम मुर्तॉह यांनी निवेदनात म्हटले आहे, की कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांना विलगीकरणात ठेवण्याची प्रक्रिया त्वरित सुरू केली गेली आहे आणि सकारात्मक चाचणी घेणारा कोणताही कर्मचारी सदस्य कार्यक्रमास उपस्थित राहणार नाही. तसेच कोरोनाबाधित कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेले कर्मचारी ही रॅलीत सहभाग घेणार नाहीत.
रॅलीला उपस्थित राहणाऱ्या प्रत्येकाचे तापमान तपासले जाईल. तसेच मास्क आणि सॅनिटायझरदेखील दिले जातील. टुल्सामध्ये गेल्या आठवड्यात कोरोनाची प्रकरणे वाढली आहेत. वाढते संक्रमण लक्षात घेता, स्थानिक आरोग्य विभागाच्या संचालकांनी रॅली पुढे ढकलण्यास सांगितले होते.