न्यूयार्क - अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून 150 दिवसांत 30 कोटी लस टोचवण्यात आल्या आहेत. याचे सर्व श्रेय बायडेन यांनी शास्त्रज्ञ, कंपन्या, अमेरिकन लोक आणि सरकार यांच्या प्रयत्नांना दिले आहे. 65 टक्के प्रौढ व्यक्तींना कमीतकमी एक डोस देण्यात आला असल्याची माहिती बायडेन यांनी दिली आहे. तर या उन्हाळ्यात परिस्थिती सामान्य राहण्याची अपेक्षा असून व्यवसाय पुन्हा सुरु होतील, अशी आशा बायडेन यांनी व्यक्त केली. येत्या उन्हाळ्याची परिस्थिती मागील वर्षापेक्षा वेगळी असेल. मी प्रार्थना करतो की यंदाच्या उन्हाळ्यात आनंद मिळेल, असेही बायडेन म्हणाले.
रोग नियंत्रण विभागानुसार, 1 जून पर्यंत अमेरिकेत 30 कोटी 50 लाख डोस टोचवण्यात आले आहेत. अमेरिकेतील 42.6 टक्के लोकांचे पूर्ण लसीकरण झाले आहे. दोन आठवड्यांपूर्वी 20 लाख लोकांचे दरदिवशी लसीकरण करण्यात येत होते. मात्र, लसीकरण गती कमी झाल्याने 4 जुलै पर्यंत कमीतकमी 70 टक्के लोकसंख्याचे लसीकरण करण्याचे बायडने यांचे लक्ष्य धोक्यात आहे.
लसीकरण झालेल्यांना मास्कची सक्ती नाही -
अमेरिकेत पूर्ण लसीकरण झालेल्यांना मास्कची सक्ती नाही. जर तुमचे पूर्ण लसीकरण (दोन्ही डोस) झाले असेल, तर तुम्हाला मास्क वापरण्याची गरज नाही, असे राष्ट्राध्यक्षांनी जाहीर केले आहे. या व्यक्तींना घरात किंवा सार्वजनिक ठिकाणी कुठेही मास्क वापरणे अनिवार्य नाही. नागरिकांनाही लवकरात लवकर लस घ्यावी आणि लसीकरण पूर्ण होईपर्यंत मास्क वापरणे सुरू ठेवा, असेही आवाहन बायडेन यांनी नागरिकांना केले आहे. अमेरिकेत 14 डिसेंबरपासून कोरोना लसीकरण करण्यात येत आहे. अमेरिकेच्या फूड अॅन्ड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने Pfizer-BioNtech च्या कोरोना लसीच्या इमर्जंन्सी वापरासाठी मंजुरी दिल्यानंतर लसीकरणाला सुरवात करण्यात आली होती. अमेरिकेत लसीकरणाची सुरुवात एका आरोग्य सेविकेला लस देऊन करण्यात आली होती.