कोलंबिया विद्यापीठाने सोमवारी यावर्षीच्या पुलित्झर पारितोषिकांची घोषणा केली आहे. यामध्ये पत्रकारितेचे १५, आणि साहित्य, नाटक आणि संगीत यामधील सात पुरस्कारांचा समावेश आहे. यावर्षी हा पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींंमध्ये तीन भारतीय छायाचित्रकारांचा समावेश आहे. चान्नी आनंद, मुख्तार खान आणि दार यासिन यांनी काश्मीरमधील गदारोळ सुरू असताना घेतलेल्या छायाचित्रांसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
पुलित्झर हा पुरस्कार पत्रकारितेतील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. अमेरिकेतील हा एक मोठा पुरस्कार आहे. १९१७मध्ये सुरू झालेल्या या पुरस्कारांचे हे १९१७वे वर्ष आहे. पुलित्झर पुरस्कार विजेत्यांना प्रमाणपत्रासर १५ हजार डॉलर्सचे बक्षीसही देण्यात येते. सार्वजनिक सेवा विभागातील पुरस्कार वगळता इतरांनाच रोख रक्कम पुरस्कारात मिळते. सार्वजनिक सेवा विभागातील पुरस्कार विजेत्याला सुवर्णपदक देण्यात येते.
यावर्षीचे पुरस्कार पुढीलप्रमाणे..
- पत्रकारिता -
१. ब्रेकिंग न्यूज रिपोर्टिंग - या श्रेणीतील पुरस्कार हा लुईसविलेमधील 'द कुरिअर जर्नल' या वृत्तवाहिनीच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे. केंचुकी राज्याच्या गव्हर्नर यांनी अखेरच्या क्षणाला मागितलेल्या शेकडो माफीनाम्यांचे सर्वाधिक जलद कव्हरेज केल्याबाबत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
२. शोधपत्रकारिता - 'द न्यूयॉर्क टाइम्स'च्या ब्रायन एम. रोसेन्थल यांना हा पुरस्कार मिळाला आहे. न्यूयॉर्कमधील टॅक्सी चालकांना आकर्षक कर्जांच्या जाळ्यात अडकवून, त्यांना देशोधडीला लावत सावकार कशाप्रकारे नफा मिळवत आहेत हे त्यांनी उघड केले होते. यामुळे राज्य आणि देशस्तरीय अन्वेषण होऊन, सरकारने व्यापक सुधारणा घडवून आणल्या.
३. स्पष्टीकरणात्मक अहवाल - 'वॉशिंग्टन पोस्ट'च्या संपूर्ण कर्मचाऱ्यांसाठी हा पुरस्कार घोषित झाला आहे. पृथ्वीवरील तापमानवाढीचा होणारा परिणाम, याबाबत वैज्ञानिक अहवालांसह स्पष्ट माहिती देणारी मालिका त्यांनी चालवली होती. त्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
४. स्थानिक वार्तांकन - 'बाल्टिमोर सन' या वृत्तपत्राच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. बाल्टिमोर शहराच्या मेयर आणि शहराची सार्वजनिक रुग्णालय व्यवस्था यांमधील अघोषित संबंध उघड करण्याबाबत त्यांनी केलेल्या वार्तांकनासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
५. राष्ट्रीय वार्तांकन - 'प्रो पब्लिका' या वृत्तसंस्थेचे पत्रकार टी ख्रिस्टियन मिलर, मेगन रोज आणि रॉबर्ट फेटुर्ची यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. पॅसिफिक महासागरामधील प्राणघातक नौदल अपघातांच्या मालिकेनंतर अमेरिकेच्या 7 व्या फ्लीटच्या त्यांनी केलेल्या शोध आणि वार्तांकनासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
यासोबतच, 'द सिएॅटल टाईम्स'चे डॉमिनिक गेट्स, स्वीव मिलेटिच, माईक बेकर आणि लेविस काम्ब यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. दोनवेळा क्रॅश झालेल्या बोईंग ७३७ मॅक्स या प्रकारच्या विमानांच्या डिझाईनमधील त्रुटी, आणि त्याबाबत सरकारचे अपयश दाखवण्यासंबंधी केलेल्या वार्तांकनासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
६. आंतरराष्ट्रीय वार्तांकन - 'दि न्यूयॉर्क टाईम्स'च्या संपूर्ण कर्मचारी वर्गाला हा पुरस्कार देण्यात आला आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्या राजवटीचा अंदाज उघडकीस आणणार्या विशेष बातम्यांच्या वार्तांकनासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. अत्यंत धोकादायक अशा परिस्थितीतून कितीतरी गोपनीय गोष्टी त्यांनी उघडकीस आणल्या होत्या.
७. फीचर लेखन - 'दि न्यूयॉर्कर' या वृत्तपत्राचे पत्रकार बेन टॉब यांना हा पुरस्कार मिळाला आहे. गुआंटानमो खाडीमध्ये एका व्यक्तीचे अपहरण करुन ठेवण्यात आले होते, त्याच्यावर अत्याचार केले गेले आणि त्याला तब्बल दशकाहून अधिक काळ स्वातंत्र्यापासून वंचित ठेवण्यात आले, अशा एका व्यक्तीबाबत त्यांनी लेख लिहिला होता. या लेखामध्ये त्यांनी दहशतवादाला अमेरिका कशाप्रकारे तोंड देत आहे याची एक वेगळी बाजू मांडली होती.
८. समालोचन - 'दि न्यूयॉर्क टाईम्स'चे निकोल हॅन्ना-जोन्स यांना हा पुरस्कार मिळाला आहे. अमेरिकेच्या इतिहासामध्ये आफ्रिकेतील गुलामगिरीला केंद्रस्थानी ठेवणाऱ्या लेखाबद्दल केलेले वार्तांकन, समालोचन आणि त्यावर त्यांनी लिहिलेला निबंध; ज्यामुळे देशाची स्थापना आणि प्रगती याबाबत लोकांमध्ये मोठ्याप्रमाणावर जागृती आणि चर्चा घडून आली. यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
९. सर्वोत्कृष्ट टीकाकार - 'दि लॉस एंजेलिस टाईम्स'चे ख्रिस्तोफर नाईट यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. लॉस एंजेलिसमधील काऊंटी म्युझियमच्या दुरुस्तीसाठी मांडण्यात आलेल्या प्रस्तावाचा, संस्थेच्या धोरणावर कसा परिणाम होईल याबाबत त्यांनी केलेल्या वार्तांकन आणि समालोचनासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
१०. संपादकीय - 'पॅलेस्टाईन हेराल्ड' प्रेसचे जेफरी गेर्रिट यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. टेक्सासच्या काऊन्टी कारागृहात पूर्व-खटल्यातील कैद्यांनी कसा भयंकर मृत्यू पत्करला, हे उघडकीस आणलेल्या संपादकीय लेखांसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
११. संपादकीय व्यंगचित्रे - 'दि न्यूयॉर्कर'चे बॅरी ब्लिट यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. व्हाईट हाऊसमधील व्यक्ती आणि घटनांचे उत्कृष्ट रेखाटन केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
१२. ब्रेकिंग न्यूज (छायाचित्रकारिता) - 'रॉयटर्स' या वृत्तसंस्थेच्या छायाचित्रकारांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हॉंगकॉंगमधील आंदोलनांचे उत्कृष्ट छायाचित्रण केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे.
१३. फीचर फोटोग्राफी - 'असोसिएटेड प्रेस'मध्ये कार्यरत असलेले चान्नी आनंद, मुख्तार खान आणि दार यासिन यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनी काश्मीरमधील गदारोळ सुरू असताना घेतलेल्या छायाचित्रांसाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे.
१४. श्राव्य वार्तांकन (ऑडिओ रिपोर्टिंग) - 'धिस अमेरिकन लाईफ'चा संपूर्ण कर्मचारी वर्ग; 'लॉस एंजेलिस टाईम्स'च्या मॉली ओटूले आणि 'व्हाईस न्यूज'च्या एमिली ग्रीन या सर्वांना संयुक्तरित्या हा पुरस्कार मिळाला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिमेन इन मेक्सिको या योजनेचा लोकांच्या जीवनावर होणारा थेट परिणाम याबाबत त्यांनी केलेल्या विशेष वार्तांकनासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
१५. सार्वजनिक सेवा - 'अँकरेज डेली न्यूज' आणि 'प्रोपब्लिका' या वृत्तपत्रांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. कित्येक दशकांपासून दुर्लक्षित असलेल्या अलास्काच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत त्यांनी वार्तांकन केले होते. अलास्काच्या एक तृतीयांश गावांमध्ये पोलीस संरक्षणच उपलब्ध नसल्याचे त्यांनी उघड केले होते, ज्यानंतर मोठ्या प्रमाणावर प्रशासन जागे झाले.