वॉशिंग्टन डी. सी - अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स, टेस्ला कंपनीचा सीईओ इलॉन मस्क आणि उद्योजक जेफ बेझोस यांच्यासह जगातील अनेक बड्या उद्योजक आणि नेत्यांची ट्विटर खाते हॅक झाल्याचे वृत्त आहे. हा हॅकिंग बिटकॉइन स्कॅम असल्याची माहिती आहे
टेस्ला कंपनीचा सीईओ इलॉन मस्क यांच्या खात्यावरून 4.17 मिनिटांनी एक विचित्र टि्वट प्रसिद्ध झाले. कोरोना महामारीमुळे मी दान करीत आहे. पुढील एका तासात माझ्या बीटीसी या खात्यावर पाठविलेले पैसे दुप्पटीने परत केले जातील, असे टि्वटमध्ये म्हटले होते. टि्वटमध्ये एक बिटकॉइन पत्ता देखील होता.
बिल गेट्सच्या खात्यातून ट्विट केले की, 'समाजाची परतफेड करण्यास मला प्रत्येकजण सांगत असतो, आता वेळ आली आहे. तुम्ही मला एक हजार डॉलर्स पाठवा मी तुम्हाला दोन हजार डॉलर्स परत पाठवीन, बिल गेट्सच्या यांच्या खात्यावरून करण्यात आलेल्या टि्वटमध्ये म्हटले आहे. पोस्ट केल्याच्या काही मिनिटांतच ही ट्वीटही हटविण्यात आली आहेत. मात्र, सुप्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांच्या ट्विटर खाते कोणी हँक केले हे अद्याप कळू शकले नाही.
दरम्यान अमेरिकेचा प्रसिद्ध रॅपर कान्ये वेस्ट, डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार जो बिडेन, जगातील सर्वात मोठी कंपन्यांमधील उबर आणि अँपल या कंपन्याची खातीही हॅक करण्यात आली आहेत.
ट्विटरचे कार्यकारी अध्यक्ष (सीईओ) जॅक डॉर्सी यांनी ट्विटरवर झालेल्या सायबर हल्ल्याबद्दल खेद व्यक्त केला आहे. आजचा दिवस आमच्यासाठी कठीण आणि भंयकर आहे. जे काही घडले आहे याबद्दल आम्हाला वाईट वाटत असून यासंबधीत तपास करत आहोत. लवकरच याबाबत माहिती देऊ, असे डॉर्सी यांनी म्हटलं आहे. संबधीत प्रकरणाचा संपूर्ण तपास होईपर्यंत टि्वटरने पासवर्ड बदलण्यासाठीच्या रिक्वेस्टही नाकारल्या आहेत.