मुंबई - मुंबईमधील कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. अशा वेळी अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना ने-आण करण्याचे काम मुंबईची दुसरी लाइफलाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेस्टच्या बसेसच्या माध्यमातून सुरू आहे. आजपासून या बसमधून सामान्य प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. यामुळे बसमधील कर्मचाऱ्यांचा प्रवाशांशी थेट संबंध येणार असल्याने फिजिकल डिस्टन्सिंग नियम पाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रवाशांसह प्रत्येक कामगारांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल, असा विश्वास बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी कामगारांना दिला आहे.
मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मुंबईची लोकल रेल्वेसेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी बेस्टच्या बसेस चालवल्या जात होत्या. आजपासून या बसेसमधून सर्वसामान्य प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पाटणकर यांनी बेस्ट उपक्रम कामगारांच्या पाठीशी असल्याचा विश्वास दिला आहे.
बेस्ट उपक्रमातील 360 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून 8 कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर 208 कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. कोरोनाची लागण झालेले बेस्टमधील 57.78 टक्के कामगार बरे झाले आहेत.
आजपासून सर्वसामान्यांसाठी बेस्ट धावत आहे. यामुळे बेस्ट बसवाहक व प्रवासी यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. बेस्ट कामगारांसह प्रत्येक प्रवाशाच्या आरोग्याची काळजी घेणे ही बेस्ट प्रशासनाची जबाबदारी आहे. वेळोवेळी बसेसचे सॅनिटायजेशन, कामगारांनी मास्कचा वापर अधिक प्रभावीपणे करणे, या सूचना देण्यात आल्याचे पाटणकर यांनी सांगितले.
वाहकांचा थेट संवाद प्रवाशांबरोबर होणार आहे. परंतु चालक, तिकीट तपासनीस यांचा संपर्क येणार नाही. त्यामुळे वाहकांसह प्रत्येक कामगार व प्रवाशांची काळजी घेतली जाईल. वाहकांनी स्वतःहून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. बेस्ट उपक्रम कामगारांच्या पाठिशी आहे, असे पाटणकर म्हणाले.
एका बसमध्ये 35 प्रवासीच -
मुंबईकरांची दुसरी लाइफलाइन बेस्ट बस आजपासून प्रवाशांच्या सेवेत रस्त्यावर धावू लागली आहे. एका बसमध्ये फक्त 30 प्रवाशांसह इतर फक्त पाच प्रवाशांना स्टॅडींग प्रवासाची सुट देण्यात आली आहे.
ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांनी प्रवास टाळावा -
ज्येष्ठ नागरिक व लहान मुले यांना कोरोनाची लागण होण्याचा धोका आहे. त्यामुळे आजपासून बेस्ट बस सुरू होत असली, तरी विनाकारण ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांनी प्रवास करू नये, असे आवाहन पाटणकर यांनी केले आहे.
कामावर येण्यास टाळाटाळ केली तर नोटीस -
लॉकडाऊनमुळे अनेक कामगार गावी अडकले आहेत. मात्र, गेल्या 70 दिवसांत ज्यांनी कामावर येण्याबाबत बेस्ट उपक्रमाला काहीच कळवले नाही. त्यांना बजावण्यात आली आहे. तसेच आजपासून जो कामगार कामावर हजर होणार नाही, त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी दिला आहे.
हेही वाचा - आजपासून सामान्य प्रवाशांसाठी 'बेस्ट' बससेवा सुरु, मुंबईकरांना दिलासा