नवी दिल्ली - देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या तब्येतीत अद्याप कोणतीही सुधारणा झाली नाही. त्यांच्यावर दिल्लीतील आर्मी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांना सध्या व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. डॉक्टरांचे एक पथक सातत्याने त्यांच्या प्रकृती सुधारणेसाठी निगराणी ठेवून आहे.
मुखर्जी यांना सोमवारी दिल्लीतील आर्मी रिसर्च अँड रेफर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मेंदूमध्ये रक्ताची गाठ निर्माण झाल्याने या ठिकाणी त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तसेच त्यांची कोरोना चाचणीही पॉझिटिव्ह आली होती. शस्त्रक्रियेनंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, त्यांच्या प्रकृतीत अद्यापही सुधारणा झाली नाही.
सोमवारी ऑपरेशन झाल्यानंतर माध्यमातून त्यांच्या निधनाच्या काही खोट्या बातम्या, आणि अफवा प्रसारित झाल्या. यावर प्रणव मुखर्जी यांचे पुत्र अभिजित मुखर्जी आणि कन्या शर्मिष्ठा यांनी नाराजी व्यक्त करत वडिलांच्या प्रकृतीबाबत माहिती देताना आमचे वडील अजून जीवंत आहेत, असे म्हणत माध्यमांना फटकारले होते.