मुंबई - बंगालच्या उपसागराच्या मध्य पूर्व भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. येत्या २४ तासात ते अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. याबाबतचे वृत्त स्कायमेट या खासगी हवामानविषयक संस्थेने दिले आहे. निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा यामुळे आवश्यक स्थिती निर्माण झाल्यास मान्सून कधीही महाराष्ट्रात धडकण्याची शक्यता आहे.
दक्षिण गुजरात आणि त्याजवळील अरबी समुद्रात चक्रीय वाऱ्यांचे क्षेत्र बनले आहे. पूर्व उत्तर प्रदेशवरही वाऱ्यांची चक्रीय स्थिती बनलेली आहे. पुढील २४ तासांत आंध्र प्रदेश, अंदमान व निकोबार, तेलंगणा, उडिशाच्या दक्षिण किनारी भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. कोकण, गोवा, कर्नाटकचा किनारी प्रदेश, केरळ आणि ईशान्य भारतात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. पंजाबचे काही भाग, विदर्भ -मराठवाड्यातील काही प्रदेश येथे हलक्या सरी पडतील. सिक्कीम, हिमालय, प. बंगाल, दक्षिण-पश्चिम मध्य प्रदेशच्या एक दोन भागांत पाऊस पडू शकतो. मध्य महाराष्ट्र, कर्नाटकचा इतर भाग, छत्तीसगड, उडिशाचा इतर भाग येथे पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे, असा अंदाज स्कायमेट ने वर्तविला आहे.
नैऋत्य मोसमी पावसाची वाटचाल तामिळनाडूच्या उर्वरित भागात पश्चिम मध्य व उत्तर बंगालच्या उपसागरच्या आणखी काही भागात आणि त्रिपुरा व मिझोरामच्या भागात झाली आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.
पुढील हवामानाचा अंदाज:
११ जून: कोकण- गोव्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
१२-१३ जून: गोव्यासह संपूर्ण राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता
१४ जून: कोंकण- गोवा व मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
इशारा :
११जून : मध्य महाराष्ट्र व मराठवाडा येथे तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.
१२ जून - गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता. गोवा व कोकण किनार पट्टीलगत जोराचा वारा वाहण्याची शक्यता.
१३ जून - कोंकण गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठवाडा विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. गोवा व कोकण किनार पट्टीलगत जोराचा वारा वाहण्याची शक्यता.
१४जून - कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.