मुंबई - मुंबई शहरातून पश्चिम उपनगरात जाण्यासाठी लागणार वेळ वाचावा यासाठी पालिकेने कोस्टल रोड उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या कोस्टल रोडच्या उभारणीसाठी तब्बल ७०४ खांब उभारले जाणार होते. मात्र त्याऐवजी आता अद्ययावत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने १७६ खांब उभारून त्यावर कोस्टल रोड उभारला जाणार आहे. हे खांब उभारण्यास सुरुवात झाली असून यासाठी आवश्यक ती यंत्रसामुग्री युरोपातून आणण्यात आल्याची माहिती सागरी किनारा मार्ग प्रकल्पाच्या प्रमुख अभियंता सुप्रभा मराठे यांनी दिली आहे.

खांबांची संख्या कमी -
मुंबईत प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी सी लिंक व पुढे वांद्रे मार्गे पश्चिम उपनगरात पर्यंत जाण्यासाठी कोस्टल रोड म्हणजेच सागरी सेतू उभारला जाणार आहे. या कोस्टल रोडवर २ किलोमीटरचे २ बोगदे तर इतर १०.५ किलोमीटरचा रस्ता समुद्रात पुलावर उभारला जाणार आहे. यासाठी पुलांखाली १७६ खांबांची उभारणी केली जाणार आहे.

परंपरागत बहुस्तंभीय पद्धतीचा वापर करुन या १७६ खांबांची उभारणी करावयाची झाल्यास प्रत्येक खांबासाठी साधारणपणे ४ आधार स्तंभ यानुसार एकूण ७०४ स्तंभांची उभारणी समुद्रतळाशी करावी लागली असती. यासाठी समुद्रतळाच्या अधिक जागेचा वापर होण्यासह खर्च व वेळ देखील अधिक लागू शकला असता. मात्र, एकल स्तंभ तंत्रज्ञानाचा वापर करुन उभारण्यात येणारे खांब हे तळापासून वरपर्यंत एकच खांब असणार आहेत. त्यामुळे ७०४ स्तंभांऐवजी १७६ स्तभांची उभारणी केली जाणार आहे. स्तंभांची संख्या ७०४ वरुन १७६ इतकी कमी झाल्यामुळे समुद्रतळाचा कमीत-कमी वापर होणार असल्याने तुलनेने अधिक पर्यावरणपूरकता साधली जाणार आहे. तसेच स्तंभांची संख्या कमी झाल्यामुळे बांधकामाच्या वेळेत व खर्चात देखील बचत शक्य होणार आहे असल्याचे मराठे यांनी सांगितले.
असे असणार खांब -
वरळी परिसरातील अब्दुल गफार खान मार्गावर असणा-या बिंदू माधव ठाकरे चौकानजिकच्या सागरी किनारा मार्गाच्या जागेत या स्तंभांची उभारणी करण्यात येणार आहे. साधारणपणे जुलै अखेरपर्यंत या स्तंभांची उभारणी पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. एकल स्तंभ तंत्रज्ञानानुसार उभारण्यात आलेल्या चाचणी स्तंभांची उभारणी पूर्ण झाल्यानंतर त्यावर वेगवेगळ्या टनांचा दाब उभ्या व आडव्या पद्धतीने देण्यात येणार आहे. या चाचणीद्वारे स्तंभांची भार वहन क्षमता व धक्के सहन करण्याची क्षमता मोजली जाणार आहे.
प्रत्यक्ष बांधकामापूर्वी ३ चाचणी स्तंभांचे बांधकाम
अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उभारण्यात येणा-या १७६ स्तंभांचा व्यास हा प्रत्येकी २.५ मीटर, ३ मीटर व ३.५ मीटर अशा ३ प्रकारच्या आकारात असणार आहे. प्रत्येक ठिकाणची गरज शास्त्रीय पद्धतीने तपासून त्या-त्या ठिकाणच्या गरजेनुसार स्तंभांचा आकार निश्चित करण्यात आला असून, त्यानुसार या स्तंभांची उभारणी केली जाणार आहे. एकल स्तंभ तंत्रज्ञानाचा वापर भारतात पहिल्यांदाच होणार असल्याने प्रत्यक्ष बांधकामापूर्वी ३ चाचणी स्तंभांचे बांधकाम करण्यात येणार आहे. हे ३ चाचणी स्तंभ अनुक्रमे २.५ मीटर, ३ मीटर, आणि ३.५ मीटर या व्यासाचे असणार आहेत. तर या स्तंभांची जमिनीखालील व जमिनीवरील एकूण उंची ही सुमारे १८ मीटर इतकी असणार आहे.