मुंबई - मुंबईमध्ये आजपासून तीन दिवस लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे. मात्र अनेक नागरिकांनी आजही लसीकरण केंद्राबाहेर गर्दी केल्याचे दिसून आले. मुलुंडच्या वीर सावरकर रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर आज देखील वरिष्ठ नागरिकांची लस घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा 'ईटीव्ही भारत'चे घेतला आहे.
लसीचा साठाच उपलब्ध नाही-
कोविड ॲपचे सर्वर डाऊन असल्यामुळे गुरुवारी ज्या नागरिकांचे लसीकरण झाले नाही, त्या नागरिकांना आज(शुक्रवारी) लसीकरणासाठी बोलाविण्यात आले होते. परंतु लसींचा साठाच उपलब्ध नसल्यामुळे आज देखील नागरिकांना पुन्हा आल्या पावली मागे फिरावं लागले. दोन ते तीन दिवस लसीकरण केंद्राबाहेर रांगा लावून देखील लस मिळत नाही, त्यामुळे नागरिक संतप्त झालेले दिसून आले.
राज्यात मोठ्या प्रमाणावर सध्या लसीकरण सुरू असताना अनेक ठिकाणी लसींचा पुरवठा अपुरा पडत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याची राजधानी असलेल्या मुंबईतही लसीच्या डोसचा साठा अपुरा असल्यामुळे पुढचे किमान ३ दिवस लसीकरण बंद राहणार असल्याचं शुक्रवारी पालिकेच्या वतीने सांगण्यात आला होते. मात्र काही ठिकाणी कालचे काही डोस बाकी होते, ते आज देण्यात येणार होते.
मुलुंड वीर सावरकर रुग्णालयातील लसीकरण केंद्रावरती गुरवारी न मिळालेला लसीकरणाचा डोस आज घेण्यासाठी गर्दी झाली होती. मात्र सकाळपासून रांग लावून सुद्धा लस न मिळाल्याने लसीकरण करण्यासाठी आलेल्या नागरिकांनी पालिकेच्या कारभारावरती नाराजी व्यक्त केली आहे. तसेच तीन दिवस लसीकरण बंद ठेवण्याचे निर्णयावर देखील काहींनी नाराजी व्यक्त करत सरकारचे ढिसाळ कारभार असल्याचे सांगितले.
हेही वाचा - रायगडात रेमडेसिवीर इंजेक्शनची खराब बॅच; 90 रुग्णांना साईड इफेक्ट