मुबंई - बॉलिवूड अभिनेत्री देसी गर्ल प्रियांका चोप्राचा आज 38 वाढदिवस. अभिनय आणि मॉडेलिंगमध्ये प्रियांकाने गाठलेली उंची प्रत्येक मुलीसाठी प्रेरणादायी आहे. बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रियांकाचा प्रवास सर्वांनाच थक्क करणारा आहे. निक आणि प्रियांकाच्या लग्नानंतर प्रियांकाचा हा दुसरा वाढदिवस आहे.
18 जुलै 1982 साली झारखंडमधील जमशेदपुर येथे प्रियांकाचा जन्म झाला. प्रियांकाचे वडील भारतीय लष्करात डॉक्टर म्हणून कार्यरत होते. मिस वर्ल्ड किताब जिंकल्यानंतर 2002 मध्ये ‘थमिझान’ या तामिळ चित्रपटातून तिने अभिनयाची सुरुवात केली. 2003 साली ‘अंदाज’ मधून तीने बॉलिवूड डेब्यू केला.
देसी गर्ल प्रियांकाने मनोरंजन क्षेत्रात दोन दशकांचा काळ पूर्ण केला आहे. ती सर्व भारतीयांसाठी नेहमीच 'देसी गर्ल' राहिली आहे. बॉलिवूडसह आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपल्या यशाची पताका फडकवल्या आहेत. प्रियांका ‘मिस वर्ल्ड 2000’ ची विजेती देखील आहे. तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार तर फिल्मफेअर पुरस्कारही मिळाले आहे. अमेरिकन टीव्ही शो 'क्वाँटिको'साठी प्रियांकाला 'पिपल्स चॉइस' पुरस्कार मिळाला आहे.
काही दिवसांपूर्वी प्रियांकाचा ‘द स्काय इज पिंक’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. या चित्रपटात प्रियांकासोबत फरहान अख्तर, झायरा वसिम मुख्य भूमिकेत होते. तर येत्या काही दिवसात प्रियांका द व्हाईट टायगरमध्ये दिसणार आहे, ती आगामी नेटफ्लिक्स वरील चित्रपटामध्ये आदर्श गौरव आणि राजकुमार राव यांच्यासोबत झळकणार आहे. हा चित्रपट अरविंद अडीगाच्या त्याच नावाच्या मॅन बुकर पुरस्कारप्राप्त कादंबरीवर आधारित असून इरानी चित्रपट निर्माते रामिन बहराणी दिग्दर्शित आहे.
सध्या प्रियांका अॅमेझॉनबरोबर दोन टेलिव्हिजन प्रकल्पांवरही काम करत आहे. भारतीय विवाहातील संगीत या विषयावरील एक मालिका ती पती निक जोनाससोबत निर्माण करीत आहे. दुसरा प्रकल्प म्हणजे सिटाडेल, अँथनी आणि जो रुसोची गुप्तचर मालिका ज्यामध्ये प्रियांका रिचर्ड मॅडन यांच्यासोबत भूमिका साकारणार आहे.