अमरावती - आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यात कोविड महामारीचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू आहे. यामुळे मद्यविक्री बंद आहे. अशा स्थितीत सॅनिटायझर प्यायल्याने नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली. यापैकी तिघांचा गुरुवारी आणि सहा जणांचा शुक्रवारी मृत्यू झाला. ही घटना जिल्ह्यातील कुरिचेदू मंडळाच्या मुख्यालयात घडली.
श्री. ए. श्रीनु (25), बी. तिरुपाटय्या (37), जी. रामेरेड्डी (60), कडियाम रामनय्या (29), रामनय्या (65), राजेरेड्डी (65), बाबू (40), चार्ल्स (45), ऑगस्टीन (47) अशी मृतांची नावे आहेत.
शहरात आणि आसपासच्या गावांमधील दारूची दुकाने गेल्या 10 दिवसांपासून लॉकडाऊनमुळे बंद आहेत. मात्र, अशा स्थितीत मद्यपींनी हातांच्या स्वच्छतेसाठी वापरल्या जाणार्या सॅनिटायझरचे सेवन केल्याचा प्रकार घडला आहे. मृतांमध्ये तीन भिकाऱ्यांचा समावेश आहे. स्थानिक मंदिरात भीक मागणाऱ्यांपैकी दोघे गुरुवारी रात्री पोटात तीव्र आग होत असल्याची तक्रार घेऊन रुग्णालयात आले. यातील एकाचा तत्काळ मृत्यू झाला. तर, दुसर्यास दार्सी येथील रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.
सॅनिटायझरमध्ये मद्य मिसळून देशी सेवन करणारी आणखी एक 28 वर्षीय व्यक्ती घरी बेशुद्ध पडली होती. तिला रुग्णालयात हलविण्यात आले असता तिचा मृत्यू झाला. याशिवाय, शुक्रवारी पहाटे आणखी सहा जणांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्या सर्वांचाही मृत्यू झाला. अशाच प्रकारच्या तक्रारी घेऊन आणखी लोकांना रुग्णालयात आणले गेले आहे काय, याचा शोध पोलीस घेत आहेत.
पोलीस अधीक्षक सिद्धार्थ कौशल यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले. ते म्हणाले की, परिसरातील दुकानातून सॅनिटायझर्स जप्त करण्यात आले असून ते रासायनिक विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत. तसेच, मृत व्यक्ती केवळ सॅनिटायझर्स वापरत होत्या किंवा काही इतर रसायनांमध्ये ते मिसळत होत्या हे शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.