नवी दिल्ली - देशातील अनेक राज्यातील सध्या ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पीएम केअर फंडातून सार्वजनिक आरोग्य केंद्रातील ऑक्सिजनची उपलब्धता वाढविण्यासाठी तब्बल 551 प्रेशर स्विंग एडजॉर्प्शन मेडिकल ऑक्सीजन उत्पादन प्लांट बसवण्यासाठी निधी मंजूर केला आहे. पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) रविवारी याची माहिती दिली.
पीएमओने सांगितले की, पंतप्रधान मोदी यांनी निर्देश दिले आहेत, की हे ऑक्सिजन प्लांट लवकारात लवकर कार्यान्वित केले पाहिजेत. हे ऑक्सिजन प्लांट देशातील विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी सरकारी रुग्णालयात बसविण्यात येतील. याची खरेदी प्रक्रिया आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय या माध्यमातून केली जाईल.
पीएमओच्या माहितीनुसार जिल्हा मुख्यालयाच्या सरकारी रुग्णालयात हे पीएसए ऑक्सिजन निर्मिती प्लांट कार्यान्वित करण्यात येतील. सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक बळकट करणे हा या मागील मूळ उद्देश आहे. या माध्यमातून प्रत्येक सरकारी रुग्णालयात ऑक्सिजन निर्माण करण्याची क्षमतेसह सुसज्ज होतील.
हे ऑक्सिजन प्लांट या रुग्णालयांची आणि जिल्ह्यातील प्रतिदिन लागणारी ऑक्सिजनची गरज पूर्ण करतील.
याशिवाय, लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (LMO) कॅप्टिव्ह ऑक्सिजन उत्पादनासाठी 'टॉप अप' च्या स्वरूपात काम करेल. या माध्यमातून जिल्हा रुग्णालयात आपत्ती काळात अचानक ऑक्सिजन तुटवड्याचा2 सामना करावा लागणार नाही आणि त्यामुळे रुग्णांना गरज पडेल तेव्हा पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध करून देता येईल.असेही पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.