मुंबई - अनुष्का शिकतोडेचे ‘मन के परिंदे' हे गाणे झी म्युझिक तर्फे प्रदर्शित करण्यात आले असून तिने त्यात भूमिकाही केली आहे, ज्यात किशोरवयीन प्रेमाची अलवार गोष्ट आहे. कुंवर अमरजित सिंग सोबतची तिची जोडी पडद्यावर जादू निर्माण करते. या गाण्याचे बोल शेरोशायरीने भरलेले असून ते प्रेरक आहेत आणि हे गाणे ‘डान्स नंबर’च्या श्रेणीतही मोडते. याआधी गेल्या वर्षी अनुष्काने ‘साथियां’ हे गाणे आणले होते आणि ते टी-सिरीजच्या पॉप चार्टबस्टर्सचा भाग होते. याही गाण्यात तिने गायनाबरोबर अभिनयसुद्धा केला होता. तिचा भाऊ सोहम आणि तिने मिळून याची निर्मिती केली होती आणि सोहमने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. या गाण्याने आतापर्यंत ८० लाख व्ह्यूजचा टप्पा ओलांडला असून दिवसागणिक ती संख्या वाढतच आहे.
मराठमोळी गायिका अनुष्का शिकतोडेने ‘मन के परिंदे' या गाण्यांमार्फत बरीच प्रसिद्धी मिळविली आहे. घरातून आईवडिलांचा, ममता आणि विजय शिकतोडे यांचा आपल्या मुलांना संगीतक्षेत्रात काम करण्यासाठी भक्कम पाठिंबा मिळतो. अनुष्काचा १९ वर्षीय भाऊ सोहम शिकतोडे सुद्धा संगीतक्षेत्रात मुशाफिरी करतोय. तो संगीत दिग्दर्शक असून म्युझिक व्हिडीओजचे दिग्दर्शन सुद्धा करीत आहे. या म्युझिकल भावाबहिणीचं संगीतक्षेत्रातील भविष्य उज्वल आहे हे निश्चित.
अनुष्का भारतातील पहिल्या ‘लव्ह ड्रिल ट्रॅक’चा हिस्सा होती ज्यात तिने डी अब्दुल च्या ‘जरुरी हैं’ या रॅप सॉंगमध्ये आवाज दिला होता. या म्युझिक व्हिडिओमध्ये रिवा अरोरा, अदनान शेख, जेनी चोप्रा आणि स्वतः अब्दुल यांसारखे आजच्या ‘इन्फ्लुएन्सर्स’नी भाग घेतला होता. तिच्या आगामी प्रोजेक्ट्स बद्दल बोलताना अनुष्का म्हणाली की, “मी आणि सोहम दोन गाणी घेऊन येत आहोत. या गाण्याची निर्मिती आणि संगीत दिग्दर्शन सोहमचे असून मी ती गायली आहेत. एक गझल आहे तर दुसरे रॅप सह हिप-हॉप गाणे आहे. रॅप गाण्यासह हिप-हॉप ट्रॅकला स्ट्रेंजर म्हणतात. हे गाणे व्यक्त होता न येण्याबद्दलच्या अडचणींबद्दल भाष्य करते तर ‘आज भी’ ही आधुनिक गझल गायकीतील गझल आहे.”
काही दिवसांपूर्वी अनुष्काने मराठीतील आघाडीचा विनोदी प्रहसनांचा कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मध्ये हजेरी लावली होती आणि आपल्या आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध केले होते. याआधी अनुष्काने ‘टिक टॉक वरती’ हे मराठी गाणे गायले होते आणि तेसुद्धा टी-सिरीजने प्रदर्शित केले होते. तरुणाईची सोशल मीडियावर असलेली भिस्त आणि ‘व्हायरल’ होण्यासाठी केली जाणारी धडपड यावर प्रभावी भाष्य केलेले आहे. समाज माध्यमांवर आयुष्य जगणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम हे गाणे करते. तरुण वयातच मराठमोळी गायिका अनुष्का शिकतोडे सामाजिक बांधिलकी जपताना दिसतेय.
हेही वाचा - अक्षय कुमारच्या 'सेल्फी' चित्रपटाचे पहिल्याच शेड्यूलमध्ये ९० टक्के शुटिंग पूर्ण