मुंबई : प्लॅनेट मराठी ओटीटीवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'अथांग' (Athang) या वेबसीरिजला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. पुढील भागात आता वाड्यात काय घडणार, हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिलेली असतानाच आता 'अथांग'चे पुढील भाग प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित झाले आहेत. (Next episode of 'Athang' web series released)
अनेक प्रश्नांची उत्तरे : मागील भागात प्रेक्षकांनी पाहिले, रावसाहेब ज्याला बाईची सावलीसुद्धा जवळपास पडलेली आवडत नाही, त्याने मास्तरांच्या बायकोला म्हणजेच सुशीलाला त्याच्या खोलीत पकडले. राऊचे पुढचे पाऊल काय असणार ? राऊ त्यांना वाड्याबाहेर काढणार की त्यांना वाड्यात राहायला परवानगी देणार? त्याला डोळ्यांसमोर दिसणारी ती अळवत कोण? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना पुढील भागांत मिळणार आहेत.
रहस्ये उलगडणार : दिग्दर्शक जयंत पवार (Jayant Pawar) म्हणतात, अथांगच्या पहिल्या भागांना मिळालेला प्रतिसाद पाहून कामाचे चीज झाल्याचे समाधान आहे. 'अथांग'चे पुढील भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. हे भागही प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारे आहेत. अनेक रहस्ये थोडीथोडी करून उलगडणार आहेत.
नवीन भागही प्रदर्शित : प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर (Akshay Bardapurkar) म्हणतात, प्रेक्षकांना आता उत्सुकता लागली आहे ती, पुढील भागात काय घडणार, ती अळवत कोण, रावसाहेबच्या स्वप्नात ती का येते, रावसाहेबच्या मनात कसली घालमेल सुरू आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना पुढील भागात मिळणार आहेत. हे नवीन भागही प्रदर्शित झाले असून खूप आनंद होतोय की, 'अथांग' ही पिरिऑडिक वेबसीरिज प्रेक्षकांना आवडतेय.
प्रमुख भूमिका : 'अथांग' या वेबसिरीजमध्ये संदीप खरे, निवेदिता जोशी - सराफ, धैर्य घोलप, भाग्यश्री मिलिंद, उर्मिला कोठारे, ऋतुजा बागवे, दीपक कदम, ओमप्रकाश शिंदे, केतकी नारायण, शशांक शेंडे, योगिनी चौक आणि रसिका वखारकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्लॅनेट मराठी, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन निर्मित, अक्षय बर्दापूरकर प्रस्तुत 'अथांग'चे तेजस्विनी पंडित, संतोष खेर निर्माते आहेत.