मुंबई - Jogeshwaris Pati Bhairavanath : देशातील ग्रामीण जनतेचं ग्रामदैवत असलेल्या कालभैरवाची आजवर पुढे न आलेली रंजक गोष्ट छोट्या पडद्यावरील 'जोगेश्वरीचा पती भैरवनाथ' या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस आलीय. उत्कंठावर्धक कथानक आणि साजेसा अभिनय यामुळे ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलीय. प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणाऱ्या या मालिकेत आता जोगेश्वरीदेवी आणि भैरवनाथाचा विवाह सोहळा पार पडणार आहे. येत्या २५ ते २८ सप्टेंबरदरम्यान हे विवाह विशेष भाग शेमारु मराठीबाणा वाहिनीवरून बघायला मिळतील.
‘जोगेश्वरीचा पती भैरवनाथ’ ही मालिका आता रंजक वळणावर आली आहे. एकीकडे पार्वतीमातेने भैरवनाथाच्या लग्नासाठी धरलेला हट्ट तर दुसरीकडे जोगेश्वरीचे लग्न प्रधान शुंभकशी लावण्याचा चंग बांधलेला राजा तक्षक आणि यामध्ये अडकलेली जोगेश्वरी अशी रंजक कथा प्रेक्षकांना पाहायला मिळतेय. राजा तक्षकाच्या महालातून भैरवनाथाने आपल्या इच्छेविरुद्ध आपले हरण केल्याने जोगेश्वरीच्या मनात त्याच्याबद्दल द्वेषाची भावना तयार झालीय. या पार्श्वभूमीवर आता पार्वती देवीने या दोघांच्या विवाहसोहळ्याची तयारी आपल्या हाती घेतलेलीय. काशीचा कोतवाल आणि महादेवाचा भक्त असलेल्या भैरवनाथाची लग्नगाठ प्रत्यक्ष महादेव आणि पार्वती देवी बांधणार असल्यामुळे या विवाह सोहळ्याला विशेष महत्त्व असणार आहे. पौराणिक कथांमध्ये अतिशय रंजक पद्धतीने वर्णन करण्यात आलेला हा लग्नसोहळा प्रेक्षकांसाठी त्याच रंजक आणि भव्य-दिव्य पद्धतीने सादर केला जाणार आहे. प्रत्यक्ष देव आणि देवीचा हा अलौकिक विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडताना पडद्यावर दिसेल. या लग्न सोहळ्यामध्ये पारंपरिक स्वरूपाचे विविध विधी बघायला मिळणार आहेत. ज्यामध्ये हळद, मधुपर्क, सीमांतपूजन, कन्यादान, सूत्र वेष्टन, सप्तपदी या विधींचा समावेश असेल. तक्षक राजाचा या लग्नाला विरोध असल्यामुळे जोगेश्वरीचे कन्यादान साक्षात भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता करणार आहे तर देवांचे देव महादेव आणि पार्वती माता या दाम्पत्याला आशीर्वाद देणार आहेत. एकंदरीत देवी-देवतांच्या साक्षीने आणि आशीर्वादाने हा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यादरम्यान तक्षक राजा आणि शंभुक काही विघ्न आणण्याचा प्रयत्न करणार का, हे बघणंही रंजक ठरेल.
आजवर केवळ मौखिक पद्धतीने ऐकलेली किंवा पुराणातून वाचलेली भैरवनाथ आणि जोगेश्वरीच्या विवाहाची कथा पहिल्यांदाच अशा पद्धतीने प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. हा विवाह सोहळा ‘जोगेश्वरीचा पती भैरवनाथ’ या मालिकेत येत्या २५ ते २८ सप्टेंबर दरम्यान रात्री ८.३० वाजता शेमारू मराठीबाणा वाहिनीवर दाखवण्यात येईल.
हेही वाचा -
१. Dev Anand 100th Birth Anniversary: सदाबहार नायक आणि स्टाईल आयकॉन देव आनंदच्या आठवणी
३. Who's Your Gynac? Trailer Out : 'हू इज युअर गायनॅक?' वेब सीरिजचा ट्रेलर रिलीज; पाहा व्हिडिओ...