मुंबई - असे म्हटले जाते की सत्य हे काल्पनिक गोष्टींपेक्षाही अद्भुत असते. कल्पनेपलीकडील वास्तवाची गोष्ट घेऊन येत आहे एक नवाकोरा मराठी चित्रपट ‘वाय’. या चित्रपटात अभिनेत्री मुक्ता बर्वे ( Mukta Barve ) ही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच अनावरीत करण्यात आले. पोस्टरवरून हा चित्रपट महत्वपूर्ण विषयावर भाष्य करणारा दिसतो आहे. पोस्टरमध्ये मुक्ताच्या संघर्षपूर्ण डोळ्यांत खंबीरपणे लढण्याची ताकद दिसत असून आजूबाजूला आगीचे लोळ दिसत आहेत. तर लाल रंगाच्या 'वाय'मध्ये ग्लोव्हस घातलेले हात वैद्यकीय हत्यार हाताळताना दिसत आहेत.
‘वाय’ एक दमदार कथा आणि आशय घेऊन प्रेक्षकांसमोर येणार असल्याचे दिसत आहे. चित्रपटाच्या 'वाय' या शिर्षकाच्या पार्श्वभागी असणाऱ्या 'Y' या इंग्रजी अक्षरामुळे ही चित्रपटाच्या आशय आणि विषयाबद्दल उत्सुकता निर्माण झालेली आहे. कन्ट्रोल-एन प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाची घोषणा नुकतीच सोशल मीडियावर करण्यात आली आहे. अजित सूर्यकांत वाडीकर दिग्दर्शित 'वाय' या चित्रपटात मुक्ता बर्वेची प्रमुख भूमिका आहे.
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अजित सूर्यकांत वाडीकर म्हणाले, ''सत्य परिस्थिती दाखवणारी, आजच्या काळात घडणारी ही कथा आहे. या भूमिकेसाठी मुक्ता शिवाय दुसऱ्या कोणत्याही अभिनेत्रीचा विचार माझ्या मनात नव्हता. मला खात्री आहे की चित्रपटातील आशय आणि मुक्ताचा अभिनय सर्वांना स्तंभित करेल. एका दाहक विषयावरील मुक्ता बर्वे अभिनित हा एक वास्तववादी चित्रपट आहे. या चित्रपटाला प्रेक्षक भरपूर प्रतिसाद देतील, अशी आशा आहे.
हेही वाचा - Dr. Amol Kolhe : डॉ.अमोल कोल्हे दिसणार ‘विठ्ठल विठ्ठला' या धार्मिक चित्रपटात!