मुंबई: ज्येष्ठ विनोदी अभिनेते सतींदर कुमार खोसला यांनी आज वयाच्या ८४ व्या वर्षी अखेरचा मुंबईत श्वास घेतला. 1967 मध्ये मनोज कुमारच्या 'उपकार' या गाजलेल्या चित्रपटामधून त्यांनी मनोरंजन जगात करियरची सुरुवात केली.
बिरबल उर्फ सतींदर कुमार खोसला यांची जन्मभूमी पंजाबची आहे. त्यांचा जन्म गुरुदासपूर येथे 28 ऑक्टोबर 1938 रोजी येथे झाला. विनोदी अभिनेता म्हणून ते फक्त पंजाबमधील प्रेक्षकांपुरते मर्यादित राहिले नाहीत. त्यांचा चाहतावर्ग हा भोजपुरी, मराठीसह हिंदीमध्येदेखील होता. महाविद्यालयीन जीवनापासून त्यांना अभिनयासह कलात्मक जीवनात करियर करण्याची इच्छा होती. महाविद्यालयीन शिक्षणापेक्षा त्यांचा भांगडाचे कार्यक्रम आणि नाटकांकडे ओढा होता.
सुमारे 500 चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोजंरजन- वडील प्रिटिंग प्रेसचा व्यवसाय करत होते. त्यांनी मुलाला प्रिटिंग प्रेसचे काम पाहण्याचा सल्ला दिला. मात्र, मुलामधील अभिनयाचे गुण पाहता त्यांना दुसऱ्या कामाची संधी दिली. वडिलांनी प्रिटिंगच्या कामाची ऑर्डर दिल्याची संधी सतींदर यांनी सुवर्णसंधी करून दाखविली. मुंबईत प्रिटिंगच्या कामासाठी आल्यानंतर त्यांनी चित्रपटांमध्ये अभिनयाची संधी शोधण्यास सुरुवात केली. अनेक महिने चिकाटीनं प्रयत्न सुरुच ठेवल्यानंतर सतींदर यांना राजा या चित्रपटात संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी सुमारे 500 चित्रपटांमधून प्रेक्षकांना खळखळून हसविले. यामध्ये मराठी, हिंदी, पंजाबी आणि भोजपूरी चित्रपटांचा समावेश आहे.
या चित्रपटात केले होते काम- राज खोसला यांच्या दो बदन (1966) व्ही. शांताराम यांच्या बूंद जो बन गई मोती (1967) या चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. विनोदी अभिनेत्याला साजेसं असं नाव म्हणून मनोज कुमार यांच्या सूचनेनुसार त्यांनी बिरबल असं नाव बदलले. मनोज कुमारच्या रोटी कपडा और मकान (1974) आणि क्रांती (1981) या चित्रपटातील त्यांची भूमिका उल्लेखनीय ठरल्या आहेत. शोले (1975), अनुरोध (1977) मध्ये अर्ध्या मिशा कापलेल्या कैद्यांची भूमिका त्यांनी साकारली होती. तर देव आनंदचा चित्रपट असलेल्या अमीर गरीबमध्ये (1974) त्यांची भूमिका चांगली गाजली होती. सतिंदर कुमार यांच्या निधनानं चाहत्यांमधून दु:ख व्यक्त होत आहे.