कोरोना आटोक्यात आल्यापासून सिनेमाक्षेत्रात धावपळ सुरु आहे. अनेक चित्रपट बनत असून कलाकारही बरेच बिझी झाले आहेत. मराठमोळी अभिनेत्री उर्मिला जगताप देखील बॅक-टू-बॅक चित्रपट करीत आहे. उर्मिलाचा रौद्र हा सिनेमा एप्रिल मध्ये रिलीज झाला. रौद्र सिनेमानंतर उर्मिला आता एका नवीन सिनेमातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. उर्मिलाने नव्या सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले असून या सिनेमाचे नाव आहे श्यामची आई. याचे दिग्दर्शन करीत आहे सुजय डहाके. साने गुरुजींच्या ‘श्यामची आई’ या मूळ कथेवर आधारीत हा चित्रपट आहे.
अभिनेत्री उर्मिला जगताप करिअरच्या सुरुवातीच्या काळातच विविध भूमिकांनी लक्ष वेधून घेत आहे. रौद्र सिनेमातल्या उर्मिलाच्या कामाचं कौतुक झाले. ‘श्यामची आई’ बद्दल बोलताना उर्मिला म्हणाली, ‘’एखाद्या कलाकारासाठी यापेक्षा आनंदाची गोष्ट काय असू शकेल. १ एप्रिलला माझा रौद्र सिनेमा रिलीज झाला, ३ एप्रिलला लगेच श्यामची आई या सिनेमाचं शूटिंग सुरू झालं. नावाजलेले प्रोजेक्ट, नवीन टीम, नावाजलेले कलाकार, त्यातही पहिल्याच सिनेमात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक सुजय डहाके, त्यामुळे सुरुवातीला थोडं दडपण होतं. पण,प्रत्यक्षात सेटवरचा अनुभव मला खूप शिकण्यासारखा होता.’’
या सिनेमाबद्दल उर्मिला पुढे म्हणाली, “या चित्रपटाचा काळ वीस-तीसच्या दशकातील असल्याने त्या काळची भाषा, देहबोली या सगळया गोष्टी मला शिकायला मिळाल्या. या भूमिकेसाठी मी जीव ओतला असं म्हणेन. सुजय सरांनी मला खूप मदत केली. भूमिकेची लांबी किती आहे यापेक्षा कोणती भूमिका आहे, टीम कोणती आहे हेही माझ्यासाठी महत्त्वाचं आहे.”
‘श्यामची आई’ मध्ये उर्मिला जगताप कोणत्या भूमिकेत दिसेल याबद्दलची अधिक माहिती लवकरच समोर येईल.
हेही वाचा - पंकज त्रिपाठीने केले लडाखमध्ये 'गुलकंदा टेल्स'चे शूटिंग, सांगितला खडतर अनुभव