दिग्दर्शक गजेंद्र अहिरे दर्जेदार आणि चाकोरीबाहेरील सिनेमांसाठी ओळखले जातात. त्यांनी अनेक नावाजलेले चित्रपट सिनेमासृष्टीला दिले आहेत. आता ते अजूनही वेगळ्या धर्तीचा चित्रपट घेऊन येत आहेत ज्याचे नाव आहे, ‘डियर मॉली’. सध्या मराठी चित्रपटांच्या यादीत अनेक दमदार चित्रपटांचा समावेश होत असतानाच आता प्रसिद्ध दिग्दर्शक गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘डिअर मॅाली’चाही यात समावेश होत आहे. हा चित्रपट मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत प्रदर्शित होणार आहे. नुकतेच ‘डिअर मॅाली’चे पोस्टर समोर आले असून यात गुरबानी गिल, अलोक राजवाडे, मृण्मयी गोडबोले, अश्विनी गिरी, लिया बॅायसेन, क्रिस्टर होल्मग्रेन मुख्य भूमिकेत आहेत.
![कौटुंबिक चित्रपट ‘डियर मॉली’!](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-gajendra-ahire-dear-molly-mhc10001_17062022000315_1706f_1655404395_681.jpeg)
सिनेसृष्टीला वेगळ्या धाटणीचे चित्रपट देणारे दिग्दर्शक गजेंद्र आहिरे म्हणतात, “अनेक दिवसांपासून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता लागली होती. अखेर प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. हा चित्रपट एका सुंदर आणि हळव्या नात्यावर भाष्य करणारा कौटुंबिक चित्रपट आहे. माझे बरेच चित्रपट सामाजिक विषयांवर आधारित आहेत. मला चौकटीबाहेरचे विषय हाताळायला विशेष आवडते.’’
![कौटुंबिक चित्रपट ‘डियर मॉली’!](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-gajendra-ahire-dear-molly-mhc10001_17062022000315_1706f_1655404395_563.jpeg)
पोस्टरमध्ये गुरबानी गिलच्या हातात पत्र दिसत असून यात असा काय मजकूर आहे, ज्याने तिचा चेहरा इतका गंभीर झाला आहे याचा उलगडा जरी झालेला नसला तरी हा एक कौटुंबिक सिनेमा असल्याचे दिसतेय. ‘गुवाहटी आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल’मध्ये ‘डिअर मॅाली’ला ‘बेस्ट फिचर फिल्म’ पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. मनमोहन शेट्टी व गणेश जैन प्रस्तुत प्रवीण निश्चल प्रॅाडक्शन्स निर्मित या चित्रपटाचे निर्माता प्रवीण निश्चल व रतन जैन आहेत. क्रिष्णा सोरेन यांनी चित्रपटाच्या छायाचित्रणकाराची धुरा सांभाळली आहे.
गजेंद्र आहिरे दिग्दर्शित ‘डिअर मॅाली’ येत्या १ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हेही वाचा - हृतिक रोशनची आजी पद्मा राणी यांचे निधन