मुंबई - सध्या रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे. परंतु कपूर किंवा भट खानदानांकडून काहीही माहिती दिली जात नाहीये. परंतु मीडिया मात्र त्यांचे ‘काँटॅक्ट्स’ वापरून बरीच माहिती गोळा करतेय. त्यातच सोशल मीडियावर या लग्नासंदर्भात बरेच व्हिडीओज व्हायरल होताहेत. दरम्यान रणबीर कपूर यांची आई नीतू कपूर प्रथमतःच एका डान्स रियालिटी शो मध्ये जजच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यासंदर्भात आमचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदम यांनी नीतू कपूर यांची भेट घेतली होती. नीतूजींनी इतर विषयांवर दिलखुलास गप्पा मारल्या परंतु जेव्हा त्यांना रणबीर आलियाच्या लग्नाच्या तारखेबद्दल स्पष्टपणे विचारले तेव्हा त्यांनी खांदे उडवत सांगितलं की ‘मला खूप वाटतंय की रणबीरचं लवकरात लवकर लग्न व्हावं. मला आलिया खूप आवडते आणि तिचे सून म्हणून मी आमच्या घरात स्वागत करण्यासाठी खूप उत्सुक आहे. परंतु मला तरी तारीख माहित नाहीये. आज उद्या किंवा कधीही लग्न होऊ शकते. (हसत हसत) अगदी आता सुद्धा झालं असेल. तुम्हाला तारीख कळली की मलासुद्धा कळवा’.
थोडक्यात नीतू कपूर यांनी रणबीर आलियाच्या लग्नाच्या तारखेबद्दल काहीही बोलण्याचे टाळले. त्या सध्या टीव्ही शो करीत असल्यामुळे त्यांना शोच्या प्रोमोशन साठी अनेक माध्यमांशी संवाद साधावाच लागतोय आणि माध्यमं साहजिकच त्या ‘हॉट टॉपिक’ वर नीतूजींना प्रश्न विचारणे स्वाभाविक आहे. परंतु या सर्व गदारोळात बिग बॉस १५ ची विजेती तेजस्वी प्रकाश ‘पापाराझी’ वर नाराज झालीय आणि तिने त्यांना एक गोड धमकीही दिली. सध्या तेजस्वी प्रकाश सोशल मीडिया प्रचंड ‘फॉलो’ होत असलेली अभिनेत्री आहे. तिला आणि तिचा बॉयफ्रेंड करण कुंद्रा यांना मीडिया नेहमी गराडा घालताना दिसतात. अशाच एका वेळी तेजस्वीला ‘पापाराझी’ फॉलो करीत होती तेव्हा तिने ते नीतू कपूरला रणबीर आलियाच्या लग्नाच्या तारखेबद्दल प्रश्न विचारून भंडावून सोडतात म्हणून राग व्यक्त केला.
“तुम्ही नीतूजींना केवढे सतावता, रणबीर आलियाच्या लग्नाच्या तारखेबद्दल प्रश्न विचारून. अगदी नोरा फतेहीला (ती सुद्धा नीतू कपूर बरोबर शो ची जज आहे) सुद्धा तो प्रश्न विचारता. मी तुमचे सगळे व्हिडीओज बघते. तुम्ही एकसारखे नीतूजींना तोच तोच प्रश्न विचारून ‘इरिटेट’ करताहात. आता यापुढे तुम्ही मला नीतूजींना त्रास देताना दिसलात तर..... (गाठ माझ्याशी आहे)”, अशा प्रकारच्या शब्दात तेजस्वीने आपली नाराजी व्यक्त केली. खरंतर लग्न ही त्या त्या कुटुंबाची अत्यंत खासगी गोष्ट आहे आणि मीडियासकट सर्वांनी त्याचा मान राखला पाहिजे अशा मतांची असलेल्या तेजस्वी प्रकाश, तिच्या आणि करण कुंद्राच्या लग्नाच्यावेळी कशी प्रतिक्रिया देते हे पाहणे ‘इंटरेस्टिंग’ असेल.
हेही वाचा - लग्नात बूट चोरणाऱ्या मेव्हणींसाठी रणबीर कपूरचे खास बजेट