मुंबई : बॉलिवूड आणि ओटीटी जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नू आज ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे. लहान वयातच अभिनय विश्वात पदार्पण करणाऱ्या तापसीने हिंदीशिवाय तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्येही आपला ठसा उमटवला आहे. तापसीने साऊथ इंडस्ट्रीतील अनेक बड्या सुपरस्टार्ससोबत काम केले आहे. यासोबतच जेव्हा ती बॉलिवूडमध्ये आली तेव्हा तिने अमिताभ बच्चन ते ऋषी कपूर यांसारख्या सुपरस्टार्ससोबत काम केले. चित्रपटांसोबतच तापसी तिच्या वक्तव्यांमुळे सोशल मीडियावरही वर्चस्व गाजवते. तिचे अनेक स्टार्सशी शाब्दिक युद्ध सुरू असते. बॉलीवूडमध्ये एक दशक पूर्ण करणारी तापसी पन्नू ही सिनेजगतातील अशा काही अभिनेत्रींपैकी एक आहे की, जिने आपल्या अभिनयाने आणि तिच्या अनोख्या चित्रपटांने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. आता या खास दिवशी जाणून घेऊया तिच्याबद्दल काही खास गोष्टी....
तेलुगु सिनेमातून केले पदार्पण : तापसी पन्नूचा जन्म १ ऑगस्ट १९८७ रोजी दिल्लीत एका शीख कुटुंबात झाला. वयाच्या आठव्या वर्षी तापसीने भरतनाट्यम शिकायला सुरुवात केली आणि जवळपास 8 वर्षे नृत्याचे प्रशिक्षण घेतले. तापसीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे तर, तिने एका टॅलेंट शोच्या माध्यमातून तिच्या अभिनयाचा पराक्रम दाखवला. तिने गेट गॉर्जियससाठी ऑडिशन दिले होते. त्यानंतर तिने मॉडेलिंगमध्ये करिअर सुरू केले. तसेच काही काळानंतर ती अभिनयाच्या दुनियेत आली. तिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. तापसीने २०१० मध्ये तेलुगु सिनेमातून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तिने अनेक भाषांमधील चित्रपटामध्ये काम केले.
तापसीचा पहिला हिंदी चित्रपट झाला फ्लॉप : तापसीने २०१३ मध्ये 'चश्मे बद्दूर' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाचे दिग्दर्शन वरुण धवनचे वडील आणि दिग्दर्शक डेव्हिड धवन यांनी केले होते. या चित्रपटात तिच्यासोबत अली जफर आणि दिव्येंदू शर्मा हे कलाकार झळकले होते. तिचा 'चश्मे बद्दूर' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. मात्र तरीही तिने हार न मानता आपले काम सुरू ठेवले. तापसी पन्नूने माजी भारतीय कर्णधार मिताली राजच्या बायोपिकमध्ये काम केले आहे. तिला आतापर्यंत दोन फिल्मफेअर पुरस्कार आणि एक ओटीटी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. २०२३ मध्ये तापसी पन्नूचे तीन चित्रपट रिलीजसाठी सज्ज आहेत. 'वो लड़की हैं कहाँ', 'डंकी'आणि 'फिर आयी हसीन दिलरुबा' या चित्रपटात ती दिसणार आहे.
हेही वाचा :