मुंबई : विनायक दामोदर सावरकर यांच्या २८ मे रोजी जन्मदिवस. यावर्षी या दिवशी भारताच्या नवीन संसद भवनाचे उदघाटन करण्यात आले. तसेच याच दिवशी वीर सावरकर यांच्यावर आधारित चित्रपट ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. स्वातंत्र्यवीर सावरकर हे स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी, समाजसुधारक, मराठी कवी व लेखक सुद्धा होते. त्यांची ‘सागरा प्राण तळमळला’ हे गीत आजही अंगावर शहारे आणते. ते हिंदू तत्त्वज्ञ आणि भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते होते. परंतु आधुनिक काळात सुरुवातीच्या दिल्लीतील राज्यकर्त्यांनी त्यांना म्हणावा तसा मान दिला नाही, किंबहुना नेहमीच अपमान केला.
स्वातंत्र्य वीर सावरकर : महाराष्ट्रात मात्र सावरकरांना मानमरातब दिला गेलाय. परंतु सर्वच दिवस सारखे नसतात, त्यामुळे आजच्या घडीला सावरकरांचे नाव आदराने घेतले जाते. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाचे लेखन अभिनेता रणदीप हुडा यांनी उत्कर्ष नैथानी सोबत केले असून रणदीप हुडा यांनी दिग्दर्शनीय कमान सांभाळली आहे. त्यानेच सावरकरांची मुख्य भूमिका साकारली असून त्याच्यासोबत अंकिता लोखंडे प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा एक ऐतिहासिक चरित्रात्मक चित्रपट आहे जो विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आणि योगदानावर प्रकाश टाकतो.
सावरकरांचा प्रेरणादायी प्रवास : भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील प्रभावशाली व्यक्ती. सावरकरांचा प्रेरणादायी प्रवास आणि स्वातंत्र्यासाठी त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांचा, त्यांच्या विचारधारा, बलिदान आणि राष्ट्राप्रती अतूट बांधिलकी यावर प्रकाश टाकणारा हा चित्रपट आहे. नेहमी उत्तम चित्रपट देणारे निर्माते आनंद पंडित आणि संदीप सिंग यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तसेच सावरकर यांच्या विषयी असलेले गैरसमज या चित्रपटाद्वारे दूर होईल अशी अपेक्षा या चित्रपटाच्या निर्मांनी केली आहे. त्यामुळेच या चित्रपटाची निर्मिती भव्य स्तरावर झाली असून प्रेक्षकांना आकर्षक सिनेमॅटिक अनुभव प्रदान करण्याचा या चित्रपटाचा उद्देश आहे. हा चित्रपट त्यांच्यातर्फे वीर सावरकरांना श्रद्धांजली असेल. या चित्रपटाचे चित्रीकरण जवळपास पूर्णत्वास आले असून संपूर्ण कास्ट आणि क्रू यांनी अथक मेहनत घेऊन या चित्रपटात योगदान दिले आहे.
वर्षाच्या शेवटी थिएटरमध्ये रिलीज होणार : यात अंकिता लोखंडे हिची महत्वपूर्ण भूमिका असून ती देखील या चित्रपटाबाबत उत्सुक आहे. 'स्वातंत्र्य वीर सावरकर’ आपल्या सकस कथानकाने, सशक्त कामगिरीने आणि ऐतिहासिक तपशिलांकडे बारकाईने लक्ष देऊन हा चित्रपट बनविण्यात आला आहे. सावरकरांची प्रेरणादायी गाथा जिवंत करणे आणि देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात त्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानावर प्रकाश टाकणे हा या चित्रपटाचा उद्देश आहे', असे, अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक रणदीप हुडा याने सांगितले. ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ हा चित्रपट या वर्षाच्या शेवटी थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज होत आहे.