हैदराबाद - साऊथ फिल्म इंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेता विजय सेतुपती त्याच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करत असताना शूटिंगदरम्यान एका स्टंटमनचा दुर्दैवी मृत्यू झाला. शूटिंग सेटवरील या हृदयद्रावक घटनेने सेटवर उपस्थित सर्व लोकांना हळहळ व्यक्त केली. वास्तविक, अॅक्शन सीन चित्रित करताना 20 फूट उंचीवरून पडून 54 वर्षीय स्टंटमन सुरेशला आपला जीव गमवावा लागला. या अपघातानंतर विजयच्या शूटिंग सेटवर शोककळा पसरली आहे.
20 फूट उंचीवरून होणार होता स्टंट - विजयच्या आगामी 'विदुथलाई' या चित्रपटाच्या सेटवर हा दर्दनाक अपघात झाला. वेत्री मारन या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाचा सेट ट्रेनच्या ढिगाऱ्यापासून बनवण्यात आला होता. दृश्यानुसार, स्टंटमन सुरेशला 20 फूट उंचीवरून उडी मारून स्टंटबाजी करायची होती.
अशा प्रकारे स्टंटमनला गमवावा लागला जीव - यासाठी सुरेशला क्रेनच्या साहाय्याने दोरीने बांधले होते, मात्र दुर्दैवाने स्टंटमन सुरेशने उडी मारताच दोरी तुटली आणि तो थेट 20 फूट जमिनीवर कोसळला. हे पाहून सेटवरील सर्वांचे भान हरपले आणि त्यांनी सुरेशला तातडीने रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पोलीस करत आहेत घटनेचा तपास - या अपघातात सेटवर उपस्थित काही संयोजकही जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे सुरेश गेल्या 25 वर्षांपासून स्टंटमन म्हणून काम करत होता. या अपघातानंतर शूटिंग थांबवण्यात आले आहे. या घटनेनंतर चित्रपटाशी संबंधित प्रत्येकजण दु:खी झाला असून पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत.