मुंबई - SP Balasubrahmanyam Memorial Day: हिंदी आणि दाक्षिणात्य संगीताचे महान गायक एसपी बालसुब्रमण्यम यांचा आज तिसरा स्मृतीदिन. अनेक पिढ्यांच्या हृदयावर राज्य केलेल्या या महान गायकानं आपल्या संपूर्ण कारकिर्दीत 40,000 हून अधिक गाणी गायली. 2020 मध्ये जेव्हा कोविडने सारे जग त्रस्त झाले होते तेव्हा त्यांनाही या महामारीची लागण झाली. यातून ते बरे होतात असे वाटतानाच त्यांची तब्येत बिघडली आणि चेन्नईच्या एमजीएम रुग्णालयात त्यांनी 25 सप्टेंबर 2020 रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्यानं संपूर्ण संगीत विश्वाचे कधीही भरुन न येणारं नुकसान झालं. एसपी बालसुब्रमण्यम यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या जीवनाशी संबंधित काही रंजक गोष्टी जाणून घेऊयात.
एसपी बालसुब्रमण्यम यांचा जन्म 4 जून 1946 रोजी आंध्र प्रदेशातील तेलुगू परिवारात झाला. त्यांचे पूर्ण नाव श्रीपती पंडितराध्यौला बालसुब्रमण्यम असं होतं. अनंतपूरच्या जेएनटीयू या अभियांत्रीकी महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला पण टायाफॉइडमुळे त्यांना शिक्षण मध्ये सोडून द्यावं लागलं. या दरम्यानं त्यांनी आपला गायनाची आवड जोपासली आणि अनेक गायन स्पर्धेत भाग घेऊन आपल्याकडं लक्ष वेधून घेतलं. त्यांच्या गायनाचं सर्वत्र कौतुक होत असल्यानं त्यांनी गायनात आपली करियर करायचं निश्चित केलं आणि ऑडिशन्स द्यायला सुरुवात केली. त्यांनी आपल्या ऑडिशनमध्ये 'निलावे एन्निदम नेरुंगधे' हे गाणं गायलं आणि त्यानंतर त्यांना 1966 मध्ये 'श्री श्री श्री मेरीदा रामण्णा' या तेलगू चित्रपटात पहिल्यांदा गाण्याची संधी मिळाली. त्यानंतर 1969 मध्ये त्यांच्या एमजीआर या तत्कालिन सुपरस्टारची भूमिका असलेल्या 'आदिमाईपेन' चित्रपटामधील 'आयराम निलावे वा' या गाण्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली.
बालसुब्रमण्यम यांनी शास्त्रीय गायनाचे औपचारिक प्रशिक्षण घेतलं नव्हतं. तरीही त्यांनी आपल्या प्रतिभेच्या जोरावर संगीत क्षेत्रात खूप उंची गाठली. अनेक प्रशिक्षित गायकांनाही जे जमलं नाही ते त्यांनी करुन दाखवलं. त्यांनी आपल्या आयुष्यात दरवर्षी 930 इतकी विक्रमी गाणी गायली आहेत. थोडक्यात त्यांनी रोज तीन गाणी गायली असेही म्हणता येईल. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सर्वाधिक 40,000 गाणी गाण्याचा महाविक्रम एसपी बालसुब्रमण्यम यांच्या नावावर नोंद आहे.
गायक एसपी बालसुब्रमण्यम यांनी कन्नड संगीतकार उपेंद्र कुमार यांच्यासाठी 12 तासांत 21 गाणी गायली होती. हा एक मोठा विक्रम मानला जातो. त्यांनी एका दिवसात 19 तमिळ गाणी आणि हिंदी भाषेत 16 गाणी रेकॉर्ड केली आहेत. बालसुब्रमण्यम यांच्या आवाजावर मोहम्मद रफी यांच्या गाण्यांचा मोठा प्रभाव होता. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक सदाबहार हिट गाणी गायली. सर्व प्रकारच्या गाण्याला त्यांनी आपल्या स्वरसाजाने उंचीवर पोहोचवलं. आज जरी बालसुब्रमण्यम आपल्यात नसले तरी त्यांचा आवाज आणि त्यांनी गायलेली मंत्रमुग्ध करणारी गाणी अजरामर आहेत.
हेही वाचा -
१. Vicky and Katrina movie together : 'कतरिनासोबत काम करायला आवडेल पण..' विकी कौशलचा खुलासा